निर्मळ होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे अनुयायी व्हा - डॉ. गुट्टे महाराज

निर्मळ होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे अनुयायी व्हा - डॉ. गुट्टे महाराज

जळगाव - वारकरी संप्रदाय संगीतातून निघणाऱ्या ध्वनीत खूप मोठी ऊर्जा आहे. त्यात एक शास्त्रीय अधिष्ठान असून, सात्त्विक संगीत आहे. यामध्ये एक वेगळी अशी अद्‌भुत शक्‍ती असून, स्वच्छ आणि निर्मळ व्हायचे असेल, तर वारकरी संप्रदायाचे अनुयायी होण्याचे महत्त्वाचे असल्याचे विचार 11 व्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाचे अध्यक्ष स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी आज येथे मांडले.

संगीतोन्मेष पुणे, सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी यांच्या विद्यमाने तीन दिवसीय 11 वे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या आवारात आयोजित संमेलनास आजपासून सुरवात झाली असून, संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी स्वामी डॉ. गुट्टे महाराज बोलत होते. सुरवातीला संमेलनाचे उद्‌घाटक अ.भ. षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती (श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर) यांच्या हस्ते स्वामी डॉ. गुट्टे यांच्याकडे वीणा देऊन अध्यक्षपद सोपविले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, संमेलनाचे समन्वयक प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, पं. यादवराज फड, कार्याध्यक्ष विष्णू भंगाळे, केशवानंद महाराज आदी उपस्थित होते.

त्रिवेणी संगमातून नादब्रह्म
स्वामी डॉ. गुट्टे म्हणाले, की टाळ-मृदंग आणि वीणा यातून एक स्वर निघतो. तरुणांना या संगीताचा उपयोग व्हावा, यासाठी असे संमेलन होणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे विज्ञान, अध्यात्म आणि संगीत या त्रिवेणीतून नादब्रह्म तयार होत असतो. हा नादब्रह्मच आपल्या आत्मस्वरूपात सामावलेला आहे. यावर अभ्यास, संशोधन व्हायला हवे. मुख्यतः तरुणांनी याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी. आपल्या रोजच्या बोलण्यातून, चालण्यातून इतकेच नाही तर जो योगा करतो हे सारे वारकरी संप्रदायातूनच येत असते. अशा माध्यमातूनच वारकरी संप्रदाय टिकून असल्याचे गुट्टे महाराज यांनी सांगितले. डॉ. कल्पना भारंबे यांनी सूत्रसंचालन केले.

शब्दब्रह्म, नादब्रह्माच्या संगीतातून संसार सुरळीत - स्वामी सागरानंद
वारकरी संप्रदाय हा सुरवातीच्या काळापासून आहे. परंतु, सुरवातीला हा विखुरलेला संप्रदाय तुकारामांच्या काळात संघटित झाला. ज्ञानेश्‍वरीत शक्‍ती, उपासना, वेदांत आहे. ज्ञानेश्‍वरीच्या प्रचारात अनेक बाधा येऊन देखील आज ज्ञानेश्‍वरी बघायला आणि वाचायला मिळतेय. वारकरी संप्रदाय संगीतातील एक नादब्रह्म आपल्या शरीरात चालत असतो. या ध्वनीनेच आपण जिवंत असून, ही ध्वनी नसती तर जगणे कठीण होते. मुख्य म्हणजे शब्दब्रह्म आणि नादब्रह्म यातून जे संगीत निर्माण होते; या संगीताच्या नादातच आपण संसार सुरळीत करतो. यामुळे आपण कोणत्या नादात जगतो याचा विचार होणे गरजेचे असल्याचे संमेलनाचे उद्‌घाटक स्वामी सागरानंद सरस्वती यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, माजी खासदार रणजिंतसिंह मोहिते पाटील, यादवराव फड यांनी देखील मनोगत व्यक्‍त केले.

'रामकृष्ण हरी'च्या घोषात ग्रंथदिंडी
जळगावात होत असलेल्या 11 व्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनात सुरवातीला परिसरातून वाद्यपूजन व ग्रंथदिंडी काढण्यात आली. सकाळी नऊला वाद्यपूजन होऊन जुन्या गावातील विठ्ठल मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरवात झाली. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे, स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते. सदर दिंडी विठ्ठल मंदिरापासून निघून कोल्हे विद्यालय- तळेले कॉलनी- शंकररावनगर या परिसरात श्रीरामाचा व हरीच्या नाम गर्जनेने परिसर दुमदुमून गेला. गवळणी साऱ्या निघून गेल्या..., सोड सोड कान्हा जाऊ दे बाजाराला...यासारख्या गवळणी सादर करत फुगडी खेळण्यात आली. दिंडीत टाळ-मृदंगाच्या गजर आणि "जय जय रामकृष्ण हरी'चा जयघोषाने वातावरण चैतन्य आले होते. दिंडीचे ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले.

संमेलनात आज
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या (5 नोव्हेंबर) सायंकाळी सहापासून प्रकाश शेजवळ यांचे मृदंग वादन, निरंजन भाकरे (औरंगाबाद) यांचे भारूड, तर अर्थतज्ज्ञ डॉ. अभय टिळक यांचे व्याख्यान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com