अक्षयतृतीयेलाही घागरी रिकाम्याच

कृष्णापुरी तांडा (ता. चाळीसगाव) - गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी भांड्यांची लागलेली रांग.
कृष्णापुरी तांडा (ता. चाळीसगाव) - गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी भांड्यांची लागलेली रांग.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पाणीटंचाईच्या दाहकतेमुळे परिसरातील कृष्णापुरी तांडा, अभोणे तांडा, दरा तांडा, विसापूर तांडा, लोंढे तांडा, पिंपळवाडी तांडा, वरखेडे तांडा या बंजारा समाजाची वस्ती असलेल्या तांड्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. आजच्या अक्षयतृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाला घागरी रिकाम्या ठेवण्याची वेळ आली. या तांड्यांवर सुमारे पंचवीस वर्षांपासून असलेल्या या परिस्थितीत काडीमात्रही बदल झालेला नाही. परिणामी मिळेल ते पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत असून, त्यामुळे काही तांड्यांवरील रहिवाशांना आरोग्याच्याही समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

चाळीसगाव शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लोंढे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कृष्णापुरी तांड्यावर पाण्याची सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तांड्याची लोकसंख्या दोन हजार दोनशे असून, या ठिकाणी अक्षयतृतीयेला घागर पुजण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी देखील वणवण झाली. त्यामुळे बंजारा बांधवांच्या पाचवीला पुजलेली ही भटकंती थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बंजारा समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने अनेकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी बाहेरील राज्यात चार महिने ऊस तोडणीसाठी जावे लागते. तांड्यावर परतल्यानंतर पिण्यासाठी पाणी नसल्याने रहिवाशांचे खूपच हाल होत आहेत. 

धरण उशाला, कोरड घशाला 
कृष्णापुरी तांड्यालगत कृष्णापुरी धरण आहे. सद्यःस्थितीत धरणात छोटेसे डबके साचले आहे. त्यातून दुर्गंधी येत असल्याने गुरे देखील त्या पाण्याला तोंड लावत नाही. याच धरणालगत दरा तांडा असून या तांड्यावरील ग्रामस्थांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पुरेसा पाऊसच न झाल्याने धरण उशाला, कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कृष्णापुरी तांड्याला ज्या विहिरीवरून पुरवठा केला जातो, ती धरणाच्या खालच्या बाजूला आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी आणखीन एक विहीर अधिग्रहीत केली आहे. त्या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नसल्याने लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. अशीच गत दरा तांड्यावरील रहिवाशांच्या बाबतीत दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही तांड्यांवर शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. 

तांड्यांवर बिकट परिस्थिती 
लोंढे, विसापूर, अभोणे, चिंचगव्हाण, राजमाने या गावांच्या तांड्यांसह दहिवद गावात तब्बल महिना महिना पाण्याचा पुरवठा होत नाही. परिणामी, महिलांची पाण्यासाठी भटकंती करावी लागते. लोंढे गावाच्या विहिरीत असलेल्या जेमतेम पाण्यावर लोंढेकरांना दिवस पार करावा लागत आहे. ज्यांची आर्थिक बाजू चांगली आहे, असे ग्रामस्थ पैसे देऊन पाणी विकत घेतात. इतरांना मात्र दररोज विकतचे पाणी घेणे परवडत नाही. परिणामी त्यांना पायपीट करूनच पाणी आणावे लागत आहे. वरखेडे गावातील गिरणा काठावर सात गावांची सामुदायिक पाणीपुरवठा योजना होती. मात्र, कालांतराने इतर योजना आल्याने अगोदरची योजना बंद पडली. त्यानंतर लोंढे गावासाठी पुन्हा विहीर अधिग्रहीत करण्यात आली. सध्या गावात पाणीटंचाई असल्याने ज्या विहिरींना बऱ्यापैकी पाणी आहे, अशा विहिरी अधिग्रहीत कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

विहिरींची कामे सुरू 
भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने सध्या क्रेनच्या साहाय्याने विहिरीतील गाळ काढण्यासह खडक फोडण्याचे काम सुरू आहे. मागीलवर्षी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही. चाळीत भरून ठेवलेला कांदा भावाअभावी चाळीतच सडला, ही परिस्थिती पाहता, बळीराजाला शेती नकोशी झाली आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी आतापासूनच विहिरींच्या कामाला लागले आहेत. काहींनी विहिरीचे खोलीकरण करूनही पाणी लागलेले नाही. हातात असलेला पैसा देखील खर्च झाला आहे, त्यामुळे शेतकरी हताश झाले असून, ‘माय खाऊ देईना अन्‌ बाप भीक मागू देईना’ अशी परिस्थिती ओढावली आहे.

सहा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा 
मेहुणबारे परिसरातील दहिवद, अभोणे तांडा, खेडी, दस्केबर्डी, सुंदरनगर, चिंचगव्हाण या सहा गावांना सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तरी देखील तहान भागत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मे अखेरपर्यंत गिरणा धरणातून आवर्तन सोडले नाही, तर या भागात अजून टॅंकर वाढवावे लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करून पाणीटंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

पाणीवाटपात दुजाभाव 
लोंढे गावासाठी वरखेडे येथील गिरणा नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कृष्णापुरी तांड्यावरून गेली आहे. या वाहिनीवरून दोन दिवस तांड्याला आणि दोन दिवस लोंढे गावाला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी कृष्णापुरी ग्रामस्थांनी केली आहे. या तांड्यावर दोनच हातपंप असून, ते तब्बल दहा वर्षांपासून नादुरुस्त आहेत. हातपंप सुस्थितीत असते तर ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागली नसती. त्यामुळे पंचायत समितीने हातपंपांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

सध्या पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. तांड्यावरून लोंढेसाठी गिरणेची जलवाहिनी गेली आहे. त्यातून तांड्यावर एक नळ पाण्यासाठी काढला आहे. मात्र, त्याला कमी पाणी येत असल्याने तासन्‌ तास ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे छोटे- मोठे वादही होतात. शिवाय दोनशे लिटर पाण्यासाठी सत्तर रुपये मोजावे लागत असल्याचे तांड्यावरील रहिवासी तथा लोंढे ग्रामपंचायतीचे सदस्य रूपसिंग जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. याबाबत त्यांनी तक्रारी देखील केल्या आहेत. या ठिकाणी पाण्याची टाकी नसल्याने पाणी आल्यावर ते पुरत नाही. प्रशासनाने पोटाला भाकरी दिली नाही तरी चालेल, पण घोटभर पाणी द्यावे, अशी भावनिक मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com