सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यात दडलंय काय? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मनसेच्या विकासनाम्याची उत्सुकता 
महापालिकेत पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या मनसेच्या विकासनाम्यात यंदा नवीन कुठले मुद्दे राहणार की जुन्या कामांचाच ऊहापोह राहील, याबाबत नाशिककरांना उत्सुकता लागली आहे. येत्या 15 फेब्रुवारीला विकासनामा प्रसिद्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यात सामाजिक दायित्वातून केलेली कामे, जकातीचे खासगीकरण रद्द करून व्यावसायिकांना दिलेला दिलासा, भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्यांचा समावेश राहणार आहे. 

नाशिक - निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारांसमोर जाताना राजकीय पक्षांना जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागेल. नाशिककरांसाठी यंदा काय नवीन मुद्दे द्यायचे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची "थिंक टॅंक' कामाला लागली आहे. पुढील आठवड्यात शिवसेना, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जाहीरनामे प्रसिद्ध केले जातील. पाच वर्षे सत्तेत राहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीरनाम्यासाठी मतदारांना किमान दहा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. 

मतदारांना आश्‍वासने देण्यासाठी शिवसेनेकडून वचननामा तयार करण्यात आला आहे. त्यात वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, वकील, डॉक्‍टर, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे मत विचारात घेण्यात आले आहे. भाजपकडून ध्येयनामा प्रसिद्ध केला जाईल. त्यासाठी 10 फेब्रुवारी ही तारीख निश्‍चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रदेश पातळीवरून नेत्यांच्या काही सूचना व शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या सूचनांचा विचार करून ध्येयनामा तयार करण्याचे काम सुरू आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विकासनामा प्रसिद्ध केला जाईल. स्थानिक प्रश्‍नांसह केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराकडे विकासनाम्यातून लक्ष वेधले जाणार आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विकासनाम्यात रोजगार, ठेकेदारी पद्धतीवर भर दिला जाईल. शहरातील आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. 

मनसेच्या विकासनाम्याची उत्सुकता 
महापालिकेत पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या मनसेच्या विकासनाम्यात यंदा नवीन कुठले मुद्दे राहणार की जुन्या कामांचाच ऊहापोह राहील, याबाबत नाशिककरांना उत्सुकता लागली आहे. येत्या 15 फेब्रुवारीला विकासनामा प्रसिद्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यात सामाजिक दायित्वातून केलेली कामे, जकातीचे खासगीकरण रद्द करून व्यावसायिकांना दिलेला दिलासा, भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्यांचा समावेश राहणार आहे. 

Web Title: all parties manifesto to be declared