अमळनेरला नवाब मलिक यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

अमळनेर : भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याबाबत व्हायरल झालेल्या कथित क्‍लिप प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह जिल्हा बॅंकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील, भाजपचे लालचंद सैनानी या तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याबाबत एक क्‍लिप व्हायरल झाली होती. यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी याविषयी तक्रार दिली होती. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनूसार लालचंद सैनानी यांना पदावरून दूर केल्याने त्यांनी संशयित आरोपीशी संगनमत करून ध्वनीफित तयार केली. अनिल भाईदास पाटील यांनी सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्यावर खोटे आरोप केले. या आरोपामुळे माझी बदनामी झाली, असा आरोप उदय वाघ यांनी केला आहे. 

ध्वनीफितीतील व्यक्तीच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल आहे. माझी व पोलिस अधिकाऱ्यांसह पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी कटकारस्थान करून जनतेत संभ्रम निर्माण व्हावा, म्हणून हे गंभीर स्वरूपाचे कृत्य केले गेले आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सखोल तपास करावा, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे. यावरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, गांजा विक्री प्रकरणात अटक झालेल्यांकडून 5 लाख रुपये प्रोटेक्‍शन मनी घेतल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. यावर खोटे आरोप करून बदनामी केल्याची तक्रारही उदय वाघ यांनी अमळनेर पोलिसात दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Amalner complaint against Nawab Malik and three other