अन् सिलिंडर रॉकेट सारखे हवेत उडाले...

cylinder
cylinder


मनमाड :  येथील रेल्वेच्या केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान ऑक्सिजन सिलिंडरचा नॉब उघडून सिलिंडर रॉकेट सारखे हवेत फेकले गेल्याची धक्कादायक घटना घडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले यामध्ये एकजण जास्त जखमी झाल्याने त्याला नाशिक येथे उपचारासाठी पाठविन्यात आले आहे. या घटनेने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत विश्वसनिय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मनमाड येथे ब्रिटिशकालीन रेल्वे पुल बनविण्याचा केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना असून त्यात मोठ्या संख्येने कामगार काम करतात. या कारखान्यात तांत्रिक कामासाठी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र आज सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान गॅस वेल्डिंग करण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरचा नॉब उघडा असल्याने तो रॉकेट सारखा उडाला व दरवाजा तोडून तीन जणांना जखमी केले.

यामध्ये साहेबराव कांबळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील रेल्वे रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जास्त जखमी असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तर दुसरे कर्मचारी जयराम रमेश गायकवाड यांच्या पायाला मुका मार तर दीपक सांगळे यांच्या पायाला मार लागला असून पाय सुजला आहे. त्यांच्यावरही रेल्वे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान ही घटना गंभीर असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असल्याचे मत कामगारांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com