मनपा प्रशासनप्रमुखांनाच शिवीगाळ केल्याने संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

जळगाव - महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नेहमीच दबाव आणण्याचा प्रकार काही विकृत घटकांकडून केला जातो. आज लोकशाहीदिनी थेट आयुक्त, उपायुक्तांना शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे नेहमीच्या या त्रासाने ग्रस्त असलेल्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

जळगाव - महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नेहमीच दबाव आणण्याचा प्रकार काही विकृत घटकांकडून केला जातो. आज लोकशाहीदिनी थेट आयुक्त, उपायुक्तांना शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे नेहमीच्या या त्रासाने ग्रस्त असलेल्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

दरम्यान, संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी म्हणून सर्व अधिकारी शहर पोलिस ठाण्यापर्यंत भिडले. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी आज पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडून या उपद्रवी घटकांचा कायमचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणीही केली.

'मनपा'तील अधिकारी, कर्मचारी एकवटले
महापालिकेत कॉ. अनिल नाटेकर, शिवराम पाटील माहिती अधिकाराच्या नावाखाली विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तक्रारींचे दबाव आणतात. त्यामुळे या दोघांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. आज या दोघांनी आयुक्त व उपायुक्तांना शिवीगाळ करून अरेरावीची भाषा केल्याने आम्ही सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्र आल्याचे सांगण्यात आले.

तक्रार देण्यासाठी पायी मोर्चा
महापालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ, अरेरावीची भाषा करणाऱ्यांविरोधात महापालिकेतील सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी घडलेल्या प्रकारानंतर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमले. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी उपायुक्त कहार, शहर अभियंता थोरात, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, आस्थापना अधिकारी राजेंद्र पाटील तसेच विविध विभागांतील अधिकारी, महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत शहर पोलिस ठाण्यात सहभाग नोंदविला.

कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांविरोधात
कर्मचारी संघटना असलेल्या शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेतील कथित नेता महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या समस्या, अन्याय सोडविण्यासाठी काम करणे सोडून याच कर्मचाऱ्यांच्या कामांवर प्रश्‍न उपस्थित करून त्यांच्यावर दबाव टाकतो. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्येच या संघटनेविषयी तीव्र भावना आहेत, त्या आजच्या निषेध आंदोलनातून समोर आल्या.

"मनपा'च्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
महापालिकेच्या मागील महिन्यात झालेल्या महासभेत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या मागणीवरून महासभेत शिरून शिवराम पाटील, मीना नाटेकर यांनी गोंधळ घातला होता. याबाबत महापालिकेतर्फे शहर पोलिसांत तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा अनिल नाटेकर व शिवराम पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जोरदार शिवीगाळ केली. त्यामुळे आधी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आधीच कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती, अशी महापालिका कर्मचाऱ्यांत चर्चा होती.

मान्यताप्राप्त संघटनांनाच मिळणार माहिती
राज्य शासनाकडून आजच राज्यातील मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनांची यादी प्रसिद्ध करून यादीतील संघटनांकडून आलेला अर्ज, माहिती अधिकारातील अर्जांची माहिती द्यावी. मान्यता नसलेल्या संघटनांना माहिती देऊ नये, असे स्पष्ट नमूद केले आहे, अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

"मनपा'त शुकशुकाट
महापालिकेत सकाळी अकराला लोकशाही दिनात घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून शहर पोलिस ठाण्यात तळ ठोकला. त्यामुळे अकरा ते दुपारी चारपर्यंत महापालिकेतील शासकीय काम पूर्णपणे बंद होते. मात्र, चार ते पाच ही नागरिकांची भेटण्याची वेळ असल्याने आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते.

उपायुक्तांनी दिली तक्रार
लोकशाही दिनात शहीद भगतसिंग, जागृत मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, उपायुक्तांना केलेली शिवीगाळ व गोंधळाची तक्रार उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार यांनी दिली. यावेळी शहर अभियंता दिलीप थोरात, नगररचनाकार निरंजन सैंदाणे, उदय पाटील उपस्थित होते. महापालिकेचे सर्व अधिकारी व महिला, पुरुष असे अडीचशे ते तीनशे कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शहर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात फक्त महापालिकेचेच कर्मचारी दिसत होते.

या लोकांनी याआधीही महासभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. लोकशाही दिन वैयक्तिक तक्रारींसाठी आहे. त्यामुळे या संघटनांकडून सार्वजनिक तक्रार घेऊन लोकशाही दिनात घातलेला गोंधळ निंदनीय आहे. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
- जीवन सोनवणे, महापालिका आयुक्त

Web Title: The angry abused Municipal administrative chief