धुळे: वसमार शिवारात वन्यपशुच्या हल्ल्यात दहा शेळ्या फस्त

दगाजी देवरे
गुरुवार, 17 मे 2018

घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे!
दरम्यान,वसमार शिवारातील घटनास्थळी आज सकाळी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले. पत्र्याच्या शेड जवळील पाणवठ्याजवळ बिबट्या व लाडग्यांची विष्ठाही आढळून आली.यावरून बिबट्यासह लाडग्यांचा कळप याभागात आल्याचे स्पष्ट होते.दिवसेंदिवस वन्यपशुंचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढत आहेत.बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

धुळे (म्हसदी) : धुळे जिल्ह्यातील वसमार (ता.साक्री) येथील शिवारात सोमवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात गो-हा फस्त झाला. ही घटना ताजी असताना आज पहाटे वसमार शिवारात त्याच ठिकाणी वन्यपशुंच्या हल्यात दहा शेळ्या फस्त झाल्या. तर अकरा शेळ्या गंभीर जखमी आहेत. तारेच्या बंदिस्त शेडमध्ये उडी मारत वन्यपशुंच्या टोळीने कळपावर हल्ला चढविला आहे. गो-हा फस्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेळ्यांवर डल्ला मारल्याने तरुण पशुपालक शेतकरी कुटुंब हतबल झाले आहे.

येथील तरुण शेतकरी भावडू उर्फ महेंद्र सुधाकर भामरे यांचे वसमार शिवारात शेत आहे. भामरे औताचे बैल, दुभती जनावरे बांधलेले असतात. शिवाय शेळ्यांचा बंदिस्त कळप आहे. पत्र्याच्या शेडला तारेच्या जाळीचे दहा फुट उंच कुंपन आहे. केवळ एका बाजूला जाळी जवळ लहान प्राणी शिरेल इतकी जागा आहे. मग अशावेळी वन्यपशु आत जाऊन शेळ्यांचा फडशा कसा पाडेल...? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आज सकाळी भामरे शेतावर गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी वनविभागास माहिती दिली. वनरक्षक डी.एम. जाधव, जी. जे. जाधव, कर्मचारी रमेश बच्छाव आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी एकचे पशुधन विकास अधिकारी डॉ. श्याम कोळेकर, परिचर भटू सासके यांनी मृत शेळींचे शव विच्छेदन करत जखमी शेळ्यांवर औषध उपचार केले. पोलिस पाटील पोपटराव, साहेबराव वाघ, सुरेश भामरे, पुरुषोत्तम देवरे उपस्थित होते.

बिबट्या की लांडगे.......!
वसमार शिवारात गेल्या आठ दिवसापासून अनेकांनी विशेषत: दिवसा बिबट्या प्रत्यक्ष पाहिला आहे.सोमवारी रात्री गो-हा फस्त झाल्याने बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे.कळपातील दहा शेळ्या फस्त झाल्याने हल्ला करणारा बिबट्या असेल की लाडग्यांचा कळप....? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.लांडगा असो वा बिबट्या होणारे नुकसान मोठे असल्याने पशुपालक शेतकरी कुटुंब हतबल झाले आहे. गो-हा आणि शेळ्या फस्त झाल्याने परिसरातील शेतकर-यांनी मोठी धास्ती घेतली आहे. कारण शेतशिवारात सर्व शेतक-यांची पाळीव जनावरे बांधलेली असतात. भारनियमनामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जातात.शेतात जाणारे शेतकरी भयभीत झाले आहेत.

घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे!
दरम्यान,वसमार शिवारातील घटनास्थळी आज सकाळी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले. पत्र्याच्या शेड जवळील पाणवठ्याजवळ बिबट्या व लाडग्यांची विष्ठाही आढळून आली.यावरून बिबट्यासह लाडग्यांचा कळप याभागात आल्याचे स्पष्ट होते.दिवसेंदिवस वन्यपशुंचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढत आहेत.बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून कर्ज काढून दुग्धव्यवसाय व शेळी पालन सुरू केले. पाण्याअभावी शेती व्यवसाय तोट्यात आहे. गो-हा फस्त झाल्यानंतर शेळीच्या कळपावर संक्रांत आली.आता सावरणे अवघड आहे.
- महेंद्र भामरे, (शेतकरी) म्हसदी

Web Title: animal killed sheep in Dhule