गांडूळ खत प्रकल्प अखेर सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

धुळे - स्वच्छ सर्वेक्षण-2017 च्या निमित्ताने का होईना महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पावरील मशिनरी आज दोन वर्षानंतर सुरू झाली. प्रकल्पावर गांडूळ खतनिर्मितीच्या अनुषंगाने इतरही उपाययोजना केल्या जात आहेत. 

वरखेडी रोडवरील कचरा डेपोच्या जागेवर एक ते दीड कोटी रुपये खर्चून महापालिकेने गांडूळ खत प्रकल्प उभारला. प्रकल्प उभा करणाऱ्या आस्था कंपनीने काही वर्षे तो सुरू ठेवला. त्यानंतर मात्र प्रकल्प चालविण्यात अडचणी येत राहिल्या. 200-300 रुपये प्रतिटन याप्रमाणे कंपनी काम करत होती. 2014 नंतर मात्र कंपनीला महापालिकेने बिल अदा न केल्याने प्रकल्प बंद पडला. तो आजतागायत बंद होता. 

स्वच्छ सर्वेक्षण-2017 मध्ये स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा संकलनाची व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट आदी विविध बाबी अंतर्भूत आहेत. या व्यवस्थांना गुण असल्याने महापालिका प्रत्येक व्यवस्था उभी राहील, यासाठी प्रयत्न करत आहे. याच प्रक्रियेत महापालिकेचा गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. 

मशिनरी झाली सुरू 
वीजबिल थकल्याने प्रकल्पावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला होता. वीज कंपनीच्या योजनेंतर्गत 38 हजार रुपये वीजबिल अदा करून प्रकल्पावरील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर महापालिकेने प्रकल्पावरील गांडूळ खतनिर्मिती प्रक्रियेसाठीची मशिनरी सुरू केली. 

36 बेडवर प्रक्रिया 
संकलित कचऱ्यातून खतनिर्मितीक्षम कचरा मशिनवर गाळल्यानंतर तो प्रकल्पावरील बेडस्‌वर टाकला जातो. या ठिकाणी असे 36 बेड आहेत. या बेडस्‌वर पाणी टाकले जाते. साधारण सहा आठवड्यांत या बेडवर गांडूळ खत तयार होते, हे खत मशिनवर पुन्हा गाळले जाते. 

तयार खताचा प्रश्‍न मिटावा 
प्रकल्पावर तयार झालेल्या खताची विक्री होऊन महापालिकेला त्याचा आर्थिक लाभ मिळणे अपेक्षित होते. यापूर्वी तयार करण्यात आलेल्या खताची मात्र वाताहतच झाली, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. या खताचा लिलाव काढूनही ते कुणी घेतले नाही. यातील काही टन खत वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वापरण्यात आले. उर्वरित खत आजही प्रकल्पावर पडून आहे. नेमके किती खत प्रकल्पावर होते व आज किती आहे याचाही लेखाजोखा कुणी घ्यायला तयार नाही, अशी स्थिती आहे. प्रकल्प पुन्हा सुरू करताना या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा नावालाच प्रकल्प सुरू झाला तसा तो बंदही झाला अशी म्हणायची वेळ येईल.

Web Title: Annulose fertilizer project start