अतिक्रमणविरोधी कारवाई, वाहनतळ, पर्यायी मार्गांवर भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

जळगाव - शहरातील वाहतुकीची कोंडी होणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील तसेच चौकांमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारे सर्व घटक दूर करण्यावर महापालिकेचा भर राहील. शहरात हॉकर्सचे अतिक्रमण, काही पक्की अतिक्रमणे आणि पार्किंगचा प्रश्‍न खूप मोठा आहे, तो दूर करण्यासंबंधी प्रस्तावित आराखड्यात प्रभावी उपाययोजना असतील. रस्त्यांच्या रुंदीकरणाला मर्यादा असली तरी रस्त्यांमधील अडथळे दूर झाले तर वाहतुकीचे नियमन व्यवस्थित होऊ शकते, त्या बाबींचा या आराखड्यात समावेश असेल. हा आराखडा पोलिसदल, शहरातील काही तज्ज्ञांच्या सहकार्याने महिनाभरात तयार करुन कार्यान्वित करण्यात येईल, अशी भूमिका महापालिकेच्या वतीने मांडण्यात आहे.

जळगाव - शहरातील वाहतुकीची कोंडी होणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील तसेच चौकांमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारे सर्व घटक दूर करण्यावर महापालिकेचा भर राहील. शहरात हॉकर्सचे अतिक्रमण, काही पक्की अतिक्रमणे आणि पार्किंगचा प्रश्‍न खूप मोठा आहे, तो दूर करण्यासंबंधी प्रस्तावित आराखड्यात प्रभावी उपाययोजना असतील. रस्त्यांच्या रुंदीकरणाला मर्यादा असली तरी रस्त्यांमधील अडथळे दूर झाले तर वाहतुकीचे नियमन व्यवस्थित होऊ शकते, त्या बाबींचा या आराखड्यात समावेश असेल. हा आराखडा पोलिसदल, शहरातील काही तज्ज्ञांच्या सहकार्याने महिनाभरात तयार करुन कार्यान्वित करण्यात येईल, अशी भूमिका महापालिकेच्या वतीने मांडण्यात आहे. तर वाहतूक नियमनासंदर्भात महापालिकेच्या सर्व प्रयत्नांना पोलिसदल आवश्‍यक पाठबळ देऊन मदत करेल, असे पोलिस अधीक्षकांनी आश्‍वस्त केले आहे.

गेल्या महिनाभरापासून "सकाळ'ने शहरातील वाहतुकीच्या समस्येबाबत वृत्तमालिका सुरु केली आहे. वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे, चौक व प्रमुख रस्ते, कारणे, त्याचे परिणाम आणि त्यासंदर्भात नेमक्‍या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, अशा विविध घटकांवर "सकाळ'ने या मालिकेत विस्तृत विश्‍लेषण दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन व पोलिस विभागाने कार्यवाही सुरु केली असून शहरातील वाहतूक नियमनाच्या संदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यासंदर्भात महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे व पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या आराखड्यात कोणत्या बाबींवर भर असेल, याबाबत माहिती दिली.

अतिक्रमणावर कारवाई, वाहनतळाच्या व्यवस्थेवर भर
नितीन लढ्ढा (महापौर) : शहरातील वाहतुकीच्या समस्येने सर्वसामान्य वाहनधारकांसह सर्वच नागरिक त्रस्त आहेत. हा विषय प्रत्येकाशी थेट संबंधित असल्याने त्यावर काम करण्याची तातडीने गरज आहे. वाहतुकीच्या समस्येचे प्रमुख कारण बेशिस्त वाहनचालकांसह रस्ते व चौकांमधील अतिक्रमण, वाहनतळांचा (पार्किंग) अभाव हेदेखील आहे. त्यातही रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. त्यामुळे वाहतूक नियमनाच्या आराखड्यात अतिक्रमणावरील कारवाई व वाहनतळाच्या समस्येवरील उपाययोजनांवर भर राहील. पक्की अतिक्रमणे काढण्याची कारवाई आम्ही सुरु केली आहे. हॉकर्सच्या स्थलांतराद्वारे काही प्रमुख रस्ते मोकळे झाले आहे. दुर्दैवाने याठिकाणी पुन्हा गाड्या लागणे सुरु झाले. त्यामुळे या कारवाईत सातत्य राखण्यात येईल. आराखड्यात सिग्लनयंत्रणा कार्यान्वित करणे, रिक्षाथांबे व वाहनतळांची निश्‍चिती, एकतर्फी मार्ग (वन-वे) प्रस्ताव, ज्या ठिकाणी वाहनतळ नाही तेथे मोठ्या रस्त्यांवर सम-विषय पार्किंग क्षेत्र, अवजड वाहनांना ज्या मार्गांवरुन बंदी आहे त्याठिकाणी या धोरणाची अंमलबजावणी या गोष्टींचाही आराखड्यात समावेश असेल.

आराखड्यासाठी शासनाच्या वाहतूक-दळणवळण शाखेची मदत
जीवन सोनवणे (आयुक्त, मनपा) : वाहतूक नियमनाचा आराखडा परिपूर्ण व योग्य होण्यासाठी शासनाच्या वाहतूक व दळणवळण शाखेचे सहकार्य घेण्यात येईल. शहरातील वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासंदर्भात हा आराखडा तयार करण्याचे आदेश शहर अभियंता व सहाय्यक संचालक, नगररचना यांना आजच देण्यात आले आहे. महिनाभरात महापालिका हा आराखडा तयार करेल. यात प्रामुख्याने प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, हॉकर्सचे स्थलांतर करणे, वाहनतळाची व्यवस्था, सम-विषम तारखांना पार्किंग क्षेत्र निश्‍चित करणे, एकमार्गी वाहतुकीच्या मार्गांचे प्रस्ताव, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा प्रत्येक मोठ्या चौकात कार्यान्वित करणे या प्रमुख बाबींचा समावेश असेल. आराखडा तयार करण्याबाबत शहरातील तज्ज्ञांच्या सूचनाही मागविण्यात येतील. यात रस्ते रुंदीकरणाच्या कामाचाही समावेश आहे. मात्र हे काम दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करता येणार नाही.

महापालिकेच्या प्रयत्नांना पोलिसदलाचे पूर्ण पाठबळ
डॉ. जालिंदर सुपेकर (पोलिस अधीक्षक) : शहरातील वाहतूक समस्येत अतिक्रमण, हॉकर्सचा प्रश्‍न अधिक तीव्र आहे. महापालिकेने त्यासंदर्भात कारवाई सुरु केली असून महापालिकेला या कारवाईसाठी आवश्‍यक पोलिस बंदोबस्त नियमितपणे पुरविण्याची आमची भूमिका आहे. मात्र, अतिक्रमणाविरोधी या कारवाईत सातत्य असण्याची गरज आहे. शहरात वाहनतळ, पर्यायी पार्किंग क्षेत्र, एकतर्फी वाहतूक मार्गाचे प्रस्ताव महापालिकेकडून प्राप्त व्हायला हवेत. काही ठिकाणी गतिरोधक आहेत, मात्र ते तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नाही. त्यामुळे गतिरोधक टाकताना तांत्रिक निकषांच्या आधारे केले पाहिजे, तशा सूचना महापालिकेला करण्यात येतील. वाहतुकीच्या व्यवस्थित नियमनात वाहनधारकांची भूमिका सर्वांत महत्त्वपूर्ण आहे. दुर्दैवाने वाहनधारकच याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. चौकाचौकात सिग्नल सुरु असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन जाणारे वाहनधारक सर्रास दिसून येतात. वाहतूक पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. मात्र, त्यातूनही काहीजण सुधरत नाहीत. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून आम्ही जनजागृतीपर मोहीम राबविणार आहोत. महापालिकेचा वाहतूक नियमन आराखडा तयार करण्यासंबंधी पोलिस विभाग म्हणून आवश्‍यक त्या सूचना व सहकार्य केले जाईल.

Web Title: Anti-infringement proceedings, Parking, alternative routes around