Loksabha 2019 : जिंका कोणीही पण दिंडोरीला यावेळी मिळणार नवा खासदार

संतोष विंचू
रविवार, 14 एप्रिल 2019

येवला : पूर्वीच्या मालेगाव मतदारसंघाची पुनर्रचना करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला आहे. मात्र त्या अगोदर २००४ पासून येथे भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हेच खासदार होते. यावेळी मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षाने बगल दिल्याने रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी कोणीही निवडून आले तरी मतदारसंघाला एक नवा चेहरा खासदार म्हणून मिळणार आहे हे नक्की!

येवला : पूर्वीच्या मालेगाव मतदारसंघाची पुनर्रचना करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला आहे. मात्र त्या अगोदर २००४ पासून येथे भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हेच खासदार होते. यावेळी मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षाने बगल दिल्याने रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी कोणीही निवडून आले तरी मतदारसंघाला एक नवा चेहरा खासदार म्हणून मिळणार आहे हे नक्की!

जेष्ठ नेते निहाल अहमद यांच्यासह जनता दलाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात जनता दलाला तीन वेळेस हरिभाऊ महाले यांच्या रूपाने खासदारकी मिळाली आहे. या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाने १९६२,६७,७१ या तीन टर्म सलग तर १९८० व ८४ या दोन आणि १९९१ व ९८ मध्ये येथे विजय मिळवला आहे. म्हणजेच सर्वाधिक सहा वेळेस काँग्रेसचे खासदार येथे होऊन गेले आहेत. जनता दल व काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात २००४ च्या निवडणुकीत महालेचा साडेचार हजारांच्या फरकाने पराभव करीत भाजपाच्या कमळावर हरिश्चंतद्र चव्हाण यांनी मतदारसंघात एंट्री केली.

पुढे मालेगाव मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये दिंडोरी हा मतदारसंघ अस्तित्वात आला. ही नवनिर्मिती चव्हाणांच्या अजूनच पथ्यावर पडली कारण पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी हा अनुसूचित जमातीसह आदिवासींचा मोठा पट्टा या मतदारसंघात समाविष्ट केल्याने हक्काची मते चव्हाणांची तयार झाली. त्याचा फायदा उठवत पुढील दोन्ही निवडणुका चव्हाण येथून विजयी झाले. कधी इतर पक्षांचे सहकार्य तर कधी मोदी लाटेचा प्रभाव अशी कारणेही कमळ फुलविण्यात कारणीभूत ठरली आहेत.

२००४ पासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असल्याने सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी राष्ट्रवादीची वल्गना फक्त भाषण पुरतीच उरल्याचे दिसते. यावेळी आता चित्र बदलले असून भाजपाने चव्हाणांना स्पर्धेतून बाद केल्याने राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार या भाजपाच्या तर शिवसेनेतून आलेले धनराज महाले हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे. याशिवाय माकपच्या तिकिटावर जीवा पांडू गावित हे देखील पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत.२००४ नंतर म्हणजे मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच चव्हाण स्पर्धेत नसल्याने यावेळी नवा चेहरा या मतदारसंघाला खासदार म्हणून मिळणार आहे हाही गमतीचा भाग म्हणावा लागेल.

असे मिळाले खासदार...
(पूर्वीचा मालेगाव मतदारसंघ) 
१९५७ - यादव नारायण जाधव (प्रजा सामाजिक पक्ष)
१९६२ - एल. एल. जाधव (काँग्रेस)
१९६७ - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
१९७१ - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
१९७७ - हरिभाऊ महाले (जनता पक्ष)
१९८० - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
१९८४ - सीताराम सयाजी भोये (काँग्रेस)
१९८९ - हरिभाऊ महाले (जनता दल)
१९९१ - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
१९९६ - कचरुभाऊ राऊत (भाजप)
१९९८ - झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
१९९९ - हरिभाऊ महाले (जनता दल)
२००४ - हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)
२००९ - हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)
२०१४ - हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)

अशी मते...असा निकाल! 
२००४ हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) - २,१८,२५९    
         हरिभाऊ महाले (जनता दल) - २,१३,७३१      
२००९ हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) - २,८१,२५४
         नरहरी झिरवाल - (राष्ट्रवादी) – २,४३,९०७, 
         जीवा पांडू गावीत – (माकप) - १,०५,३४२     
२०१४ हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) - ५,४२,७८४
        डॉ. भारती पवार (राष्ट्रवादी) - २,९५,१६५

 

 

 

Web Title: Anybody Will win but Dindori will get the new MP this time