परप्रांतीय मजुरांना मेहुणबारे पोलिसांचे आवाहन 

दीपक कच्छवा
गुरुवार, 5 जुलै 2018

राईनपाडा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर श्री. शिरसाठ यांनी आपल्या पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ग्रामस्थांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - 'मुले चोरणारी टोळी आली आहे, अशा अफवा पसरून अनुचित घटना घडत आहेत. त्यामुळे विशेषतः परप्रांतीय मजुरांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना कळवावे. जेणेकरून त्यांच्या बाबतीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही', असे येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी सांगितले. 

राईनपाडा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर श्री. शिरसाठ यांनी आपल्या पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ग्रामस्थांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामावर परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने काम करीत आहेत. त्यांना मराठी व अहिराणी भाषा पाहिजे तशी समजत नसल्याने त्यांच्या बाबतीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्यक्ष कामाच्या साईटवर जाऊन त्यांना श्री. शिरसाठ यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. याप्रसंगी कामगारांना त्यांच्या भाषेत बोललेले लक्षात यावे, यासाठी दोन्ही भाषा जाणणाऱ्या एका तज्ज्ञाची मदत घेण्यात आली होती. श्री. शिरसाठ यांनी सांगितले, की मजुरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी पोलिस सदैव त्यांच्यासोबतच आहेत. मात्र, त्यांनी कुठेही जाताना विशेषतः एखाद्या खेड्यात किंवा अनोळखी ठिकाणी पोलिसांना सांगून जावे. ग्रामस्थांनीही मुले पळविण्याच्या संदर्भात सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर लगेचच विश्‍वास ठेवू नये. कुठल्याही मेसेजची खात्री करावी. गावात संशयित व्यक्ती आढळून आल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करावी. कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपनिरीक्षक नाजीम शेख व सहकारी उपस्थित होते.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Appeal of Mehunabare police to outsiders workers