नेमणूक अन् वेतनही पाटोद्यात पण कर्मचारी अकरा वर्षापासून परागंदा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

येवला : नेमणूक पाटोदा आरोग्य केंद्रात अन् वेतनही निघते येथेच...मात्र कर्मचारी कार्यरत आहेत जिल्हा परिषदेत..ते ही मागील अकरा वर्षांपासून..यामुळे अपुरी कर्मचारी संख्या असलेल्या येथील रुग्णालयातून वेळेत उपचारासाठी मर्यादा येत आहेत.

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यावर सीईओ डॉ.गीते कारवाईचा बडगा उगारत असल्याने आता त्यांनीच आम्हांला न्याय देऊन या कर्मचाऱ्याला येथे पाठवावे किंवा नव्याने कर्मचारी नेमावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

येवला : नेमणूक पाटोदा आरोग्य केंद्रात अन् वेतनही निघते येथेच...मात्र कर्मचारी कार्यरत आहेत जिल्हा परिषदेत..ते ही मागील अकरा वर्षांपासून..यामुळे अपुरी कर्मचारी संख्या असलेल्या येथील रुग्णालयातून वेळेत उपचारासाठी मर्यादा येत आहेत.

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यावर सीईओ डॉ.गीते कारवाईचा बडगा उगारत असल्याने आता त्यांनीच आम्हांला न्याय देऊन या कर्मचाऱ्याला येथे पाठवावे किंवा नव्याने कर्मचारी नेमावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्राला परीसारतील सुमारे १६ गावे जोडलेली असून दररोज अनेक रुग्ण येथील रुग्णसेवेचा लाभ घेतात. अनेकदा दुरून आलेल्या रुग्णांना येथील रुग्णालयात औषध निर्माण अधिकारी नसल्याने गोळ्या औषधासाठी तासनतास ताटकळत बसावे लागते. आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या अपूर्ण संख्येमुळे चांगली सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा विस्कळीत झाली असून याकडे उघडपणे डोळेझाक होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागाचे एक कर्मचारी एस.एस.निकाळे यांची २००६ साली औषध निर्माण अधिकारी म्हणून पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली होती.मात्र काही महिन्यातच प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत गेले ते आजतागायत.रुग्ण कल्याण नियामक समितीच्या अनेक बैठकांमध्ये सदर कर्मचाऱ्याची नियुक्ती रद्द करण्यात यावी व त्यांना परत नियुक्तीच्या मूळ ठिकाणी रुजू करण्याचे आदेश देण्यात यावे किंवा येथे नवीन औषध निर्माण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येऊन रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यात यावी अशा प्रकारचे ठराव करण्यात आले. मात्र यासंदर्भात प्रशासनाने कोणताही निर्णय न घेता या कर्मचाऱ्यांला एक प्रकारे अभय दिल्याने येथील रुग्णांची हेळसांड होत आहे.

सद्या तात्पुरत्या स्वरुपात औषध निर्माण अधिकारी या पदाचा कारभार एका कर्मचाऱ्याडे सोपवण्यात आला असून प्रत्यक्षात मात्र दुसराच कर्मचारी हे काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.रुग्णांना केस पेपर देणे, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे वाटप करणे,औषधांचा हिशोब ठेवणे,आवश्यक त्या औषधांची मागणी करणे केस पेपरच्या रकमेचा भरणा करणे अशी अनेक प्रकारची कामे या पदाकडे असल्याने या सगळ्या कामाचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे.१७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्याचे वेतन येथून काढण्यात येऊ नये असा ठराव सर्वानुमते करण्यात आला असला तरी यंत्रणा मात्र सुस्त झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

“नागरिकांच्या हिताचा हा विषय असल्याने अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या मात्र प्रशासन डोळेझाक करत आहे. अनास्था व हलगर्जीपणामुळे येथील रुग्णांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सर्व रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येऊन रुग्णांची होणारी गैरसोय थांबवण्यात यावी.”
- मोहन शेलार, सदस्य पंचायत समिती येवला

“सदरच्या कर्मचाऱ्याच्या मागणीच्या रुग्ण कल्याण समितीच्या ठरावांची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवली आहे.या विषयी वरिष्ठांच्या आदेशाची तात्काळ अमलबजावणी करण्यात येईल"
- प्रवीण पाठक, तालुका आरोग्य अधिकारी येवला 

Web Title: appointment and salary in patoda but no availability of employees