राज ठाकरे यांच्या कल्पकतेला रतन टाटा यांची दाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनौषधी उद्यानाला आज टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी भेट दिली. पर्यावरणाचा जागर करणारी बोलकी झाडे, उद्यानात ठेवलेले फायबरचे प्राणी, फुलपाखरांच्या आकाराच्या प्रतिकृतींची पाहणी केली. उद्यानात भविष्यात साकारल्या जाणाऱ्या प्रकल्पाची माहिती स्वत: राज यांनी दिली. पाहणीनंतर रतन टाटा यांनी राज यांच्या कल्पकतेला दाद देत. सुंदर, अप्रतिम या शब्दांत भावना व्यक्त केली.

पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या जवाहरलाल नेहरू वनौषधी उद्यानाला नवे रूप देण्याची संकल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मांडली होती. त्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्वातून 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अंदाजे तेरा कोटी रुपये खर्चून उद्यानाच्या काही भागात सुशोभीकरण केले आहे. फुलपाखराच्या आकाराचे प्रवेशद्वार, वनौषधी उद्यानांची माहिती देणारे फलक, फुलपाखरांची प्रतिकृती असलेली बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी फायबरचे बोलके प्राणी व सर्वांत महत्त्वाचे आकर्षण असलेल्या बोलकी झाडे, या प्रकल्पांचे उद्‌घाटन गेल्या महिन्यात करण्यात आले होते. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेल्या प्रकल्पाची आज रतन टाटा यांनी पाहणी केली. ओझर विमानतळावर टाटा यांचे स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यानंतर थेट वनौषधी उद्यानाला टाटा यांनी भेट दिली.

उद्योजक, व्यावसायिकांची भेट
देशातील मोठ्या उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा नाशिकला भेट देणार असल्याने नाशिककरांमध्ये उत्सुकता होती. वनौषधी उद्यानाच्या प्रवेशद्वारावरचं टाटांची भेट घेण्यासाठी गर्दी होती. त्यात उद्योजक व व्यावसायिकांची संख्या लक्षणीय होती. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उदय खरोडे, फ्रावशी अकादमीचे रतन लथ, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी, क्रेडाईचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील भायभंग, नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल आदींनी टाटा यांची भेट घेतली.

Web Title: Appreciating the creativity of Raj Thackeray Ratan Tata