"आयटीआय' प्रवेशासाठी अडीच हजार अर्ज 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

"आयटीआय' प्रवेशासाठी अडीच हजार अर्ज 

"आयटीआय' प्रवेशासाठी अडीच हजार अर्ज 

जळगावः दहावी झाल्यानंतर ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी "आयटीआय'चा पर्याय निवडतात. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेला सात जूनपासून सुरवात झाली. आज प्रवेश अर्ज निश्‍चितीच्या शेवटच्या दिवशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक आणि दोन वर्षांचे कोर्स मिळून असलेल्या 878 जागांसाठी सुमारे 2 हजार 550 अर्ज निश्‍चित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठीची चुरस वाढली आहे. 
"आयटीआय'ची प्रवेशप्रक्रिया दोन वर्षांपासून ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया घेण्यात येत आहे. यात दहावी परीक्षेचा निकाल यंदा चांगला लागला असून, बहुतांश विद्यार्थ्यांना 70 ते 80 टक्‍के गुण मिळाले आहेत. यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा एकप्रकारे कस लागणार आहे. वेगवेगळ्या 22 "ट्रेड'साठी अर्ज ऑनलाइन जमा असून अर्ज तपासणीसाठी विद्यार्थ्यांच्या "शासकीय आयटीआय'मध्ये रांगा लागलेल्या पाहण्यास मिळाल्या. गुरुवारी (5 जुलै) प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

यंदा 878 जागा 
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्षाच्या कोर्सचे आठ "ट्रेड' असून, यात 14 तुकड्यांमधून 303 जागा आहेत ; तर दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात 14 "ट्रेड' मधून 29 तुकड्यांमध्ये 569 जागा, अशा 878 जागा यंदा "आयटीआय'साठी आहेत. गतवर्षी खुल्या प्रवर्गात 80 टक्‍क्‍यांवर प्रवेश बंद झाले होते. यामुळे यंदाचा निकाल पाहता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धाच राहणार आहे. 

गुरुवारी लागणार यादी 
प्रवेशास पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवारी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर 5 ते 6 जुलैदरम्यान गुणवत्ता यादीबाबत हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहे. यानंतर 10 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. 

Web Title: arja