नाशिक: सुटी संपवून लष्करात परतणाऱ्या जवानाचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

सागर रानुबा खुरसने हे सुट्टी संपवून कर्तव्यावर परतत असताना भावासह आपल्या मोटारसायकलने मनमाड रेल्वे स्थानकाकडे जात असताना पाटोदा ठाणगाव दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

येवला : भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेले ठाणगाव येथील जवान सागर रानुबा खुरसने (३३) सुट्टी संपवून कर्तव्यावर जात असताना शनिवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघाताने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने ठाणगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की सागर रानुबा खुरसने हे सुट्टी संपवून कर्तव्यावर परतत असताना भावासह आपल्या मोटारसायकलने मनमाड रेल्वे स्थानकाकडे जात असताना पाटोदा ठाणगाव दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ व मुलगाही या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत येवला तालुका पोलिसांना माहिती देऊनही पोलीस सुमारे दोन तासानंतर घटनास्थळी आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जर सैन्यात असलेल्या जवानाच्या बाबतीत पोलीस इतके बेफिकीरपणे वागत असतील, तर सामान्यांचे काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. अगदी काही क्षणातच होत्याचे नव्हते झाल्याने खुरसने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मृत सागर खुरसने यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.

Web Title: army jawan dead in accident near Nashik

टॅग्स