लष्करी जवानाचा प्रताप, हमालांना मनस्ताप!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

देवळालीगाव : जनता एक्‍स्प्रेसने प्रवास करायचा आहे, असे सांगून हमालांकडे सामान सोडून परागंदा झालेल्या एका लष्करी जवानाच्या प्रतापामुळे रात्रपाळीतील चार हमालांना नाहक रात्रभर जागून कुठलाही मोबदला न मिळता सामानाची देखभाल करावी लागली. अशा परिस्थितीत स्थानक उपव्यवस्थापकांनी हमालांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य न केल्याने कडाक्‍याच्या थंडी हमालांना नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. दुसऱ्या दिवशीही जवानाचा ठावठिकाणा न लागल्याने तो जवानच होता की आणखी कोणी? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

सोमवारी (ता. 3) मध्यरात्री एक वाजून 50 मिनिटांनी (गाडी क्रमांक 13202 डाउन) जनता एक्‍स्प्रेसने जाण्यासाठी एका लष्करी जवानाने पार्सल कार्यालयात जमा असलेले प्रवासी सामान (मिलिटरी बॉक्‍स, ट्रॉलीबॅग, हॅन्डबॅग, स्लॅगबॅग) फलाट क्रमांक दोनवर येणाऱ्या जनता एक्‍स्प्रेसच्या एस-4 या बोगीजवळ वाहून नेण्यासाठी चार हमालांची मदत घेतली. हमालांनीही अर्धा तास अगोदरच सर्व सामान फलाटावर नेऊन ठेवले. गाडीला येण्यासाठी बराच अवधी असल्याने, "मी स्थानकाबाहेर जाऊन येतो', असे हमालांना सांगून जवान निघून गेला. गाडीची वेळ जवळ येत असल्याने त्याला शोधण्यासाठी हमालांची एकच धावपळ उडाली. चारही हमालांनी आपापल्या परीने त्याचा शोध घेतला. संपूर्ण रेल्वेस्थानक परिसर त्यांनी पिंजून काढला; परंतु कुठेही त्यांना तो जवान आढळला नाही. अखेर एक वाजून 50 मिनिटांनी गाडी स्थानकातून निघून गेली. तरीही तो जवान सामानाजवळ फिरकलाच नाही. हमालांनी बराच वेळ फलाटावर त्याच्या येण्याची वाट पाहिली. पण रात्र व्यर्थ गेली. 

एका जवानाचे किमती सामान आपल्या ताब्यात असल्याने चारही हमालांनी व्यवसाय केला नाही. संपूर्ण रात्र जवानाच्या सामानाची देखभाल करण्यातच काढली. 

स्थानक उपव्यवस्थापकांना याबाबतची माहिती देऊनही त्यांनी वेळेवर सामान ताब्यात घेऊन मदत केली नाही. जवान कुठे बाहेर गेला असेल येईल, त्याची वाट पाहा, असे सांगून हमालांना रात्रभर थंडीत ताटकळत ठेवले. पोलिसांनीही थोडा वेळ वाट पाहण्याचा सल्ला दिला. वाट पाहता पाहता सकाळचे आठ वाजले, रात्रपाळी संपून दिवसपाळीचे हमाल ड्यूटीवर हजर झाले, तरीही जवान काही सामान घेण्यासाठी येईना. अखेर सकाळच्या पाळीतील एका हमालाने मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा यांच्याशी संपर्क साधून मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हमालांनी त्या जवानाचे सामान अतिशय सुरक्षित लॉकर रुममध्ये ठेवल्यानंतरच रात्रपाळीच्या हमालांची मनस्तापातून सुटका झाली. 

जवान संपर्क क्षेत्राबाहेर 
दुसऱ्या दिवशीही हमालांनी जवानाची वाट पाहिली; परंतु ठावठिकाणा लागत नसल्याने नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या वरिष्ठांशी संपर्क साधून जवानाबाबतची माहिती दिली. आर्टिलरी सेंटरमधून मंगळवारी (ता. 4) सकाळी दोन अधिकारी रेल्वेस्थानकात चौकशीसाठी येऊन गेले. लष्करी बॉक्‍सवरील नाव व नंबरवरून त्याच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगितले.

Web Title: army man s misbehave and problem to coolie