Dhule Crime News : फरारी होण्यात मदत करणाऱ्या तिघांना अटक; 22 मेपर्यंत पोलिस कोठडी | Arrested three people who helped absconding Police custody till May 22 LCB Action Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest News

Dhule Crime News : फरारी होण्यात मदत करणाऱ्या तिघांना अटक; 22 मेपर्यंत पोलिस कोठडी

Dhule News : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस शहादा न्यायालयाच्या आवारातून फरारी होण्यात मदत करणाऱ्या तिघांना एलसीबीच्या पथकाने राजस्थानमधून अटक केली असून, गुरुवारी येथील न्यायालयात हजर केले असता २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

बिकानेर (राजस्थान) येथील आरोपी ओमप्रकाश ऊर्फ ओमाराम किसनलाल जाट (रा. सिओल की ठानी धोजापूर, बायतू, जि. बाडमेर) याला ८ मे २०२३ ला वाहनचोरीच्या गुन्ह्यात शहादा पोलिसांनी अटक केली होती.

आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्याने त्याला न्यायालयाच्या आवारात कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी हातकडी लावत असताना झटका देऊन व हाताबुक्क्यांनी मारहाण करून पसार झाला होता. (Arrested three people who helped absconding Police custody till May 22 LCB Action Dhule News)

पसार होताना विनाक्रमांकाच्या स्कॉर्पिओद्वारे त्याने पलायन केले होते. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरारी आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक बाडमेर येथे रवाना झाले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी केसाराम ऊर्फ केसा मंगाराम जाट (वय २५, रा. लापुंदडा, जि. बाडमेर), प्रमाराम चैनाराम जाट (२४, रा. दुधू, ता. धोरीमन्ना-रामनगर, बाडमेर), नरपत गोवर्धनराम जाट (रा. मानपुरा, ता. बाडमेर) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचे वाहन (जीजे १७, सीए ००३५) व दहा लाख रुपये किमतीची कार (जीजे ०३, एचआर ५८९२) जप्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गुन्ह्यात सहभाग असलेले तीन आरोपी कोलसाराम खेराजराम जाट, हेमाराम कमलेश जाट, प्रकाश जुगताराम जाट (बेनिवाल), (तिघे रा. बायतू, जि. बाडमेर, राजस्थान) हे फरारी होण्यात यशस्वी झाले.

आरोपीस फरारी करण्यामध्ये सहा आरोपींचा समावेश होता. यांपैकी तिघांना अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिघांना २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान पोलिसांच्या ३९ जणांच्या टीमसह एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहाद्याचे सहाय्यक निरीक्षक जितेंद्र पाटील, एलसीबीचे फौजदार अनिल गोसावी, हवालदार दीपक गोरे, शोएब शेख, विकास कापुरे, अनिल पवार, अनिल जिरेमाळी यांच्या पथकाने केली.

आठ दिवस शोधमोहीम

दरम्यान, ८ मेस आरोपी फरारी झाल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने आरोपी व त्याच्या साथीदारांना जेरबंद करण्यासाठी स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाला राजस्थानमध्ये पाठविले होते. पथक आठ दिवस राजस्थानमध्ये राहून राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने सहापैकी तीन आरोपींना अटक करण्यात यशस्वी झाले.