धाक संपला, म्हणूनच... भय इथले संपत नाही..!

सचिन जोशी
सोमवार, 1 जुलै 2019

जळगावमधील विख्यात मू. जे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी झालेल्या तरुणाच्या हत्येने कायदा-सुव्यवस्थेवर जसे प्रश्‍नचिन्ह उभे केले, तशी ही घटना तरुणाईच्या मानसिकतेवर विचार करायला लावणारीही ठरली आहे. विशीतली तरुणाई हाती शस्त्र घेऊन अशी फिरायला लागली तर महाविद्यालयीन सुरक्षा यंत्रणा काय करतेय? ही एकमेव नव्हे, अशा अनेक लहान-मोठ्या घटना आजूबाजूला दररोज घडताहेत.. पोलिसांचा धाक संपलाय... अन्‌ त्यामुळेच ‘भय इथले संपत नाही..’ अशी स्थिती निर्माण झालीय... 

जळगावमधील विख्यात मू. जे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी झालेल्या तरुणाच्या हत्येने कायदा-सुव्यवस्थेवर जसे प्रश्‍नचिन्ह उभे केले, तशी ही घटना तरुणाईच्या मानसिकतेवर विचार करायला लावणारीही ठरली आहे. विशीतली तरुणाई हाती शस्त्र घेऊन अशी फिरायला लागली तर महाविद्यालयीन सुरक्षा यंत्रणा काय करतेय? ही एकमेव नव्हे, अशा अनेक लहान-मोठ्या घटना आजूबाजूला दररोज घडताहेत.. पोलिसांचा धाक संपलाय... अन्‌ त्यामुळेच ‘भय इथले संपत नाही..’ अशी स्थिती निर्माण झालीय... 

काल- परवाच विद्यापीठात नव्याने अधिनियमात तरतूद केलेल्या महाविद्यालयीन निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुळात, महाविद्यालयीन निवडणुका बंद होण्यामागे त्यातील गैरप्रकार, दबावतंत्र, त्यातून होणाऱ्या हाणामाऱ्या आणि पुढे जाऊन त्याला प्राप्त झालेले ‘टोळीयुद्धा’चे स्वरूप ही कारणे होती. शासन या सर्व कारणांवर मात करून पुन्हा एकदा महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचा विचार करत असेल आणि त्यातून नवतरुणाई नेतृत्वासाठी सिद्ध होत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे.

मात्र, शनिवारी जळगावमधील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये झालेली तरुणाची हत्या येत्या काळात होऊ घातलेल्या महाविद्यालयीन निवडणुकीसाठी धोक्‍याची घंटा समजावी लागेल. अर्थात, ही हत्या काही अशाप्रकारच्या निवडणूक वादातून घडलेली नाही. हत्येमागचे कारण वेगळे आहे, ते अगदीच किरकोळही असू शकेल. मात्र, अशा किरकोळ कारणातून थेट करिअर घडविण्यासाठी उच्च शिक्षणाची सुरवात करणाऱ्या तरुणाचा बळी घेतला जात असेल तर, अशा तरुणाईच्या मानसिकतेवर याच नव्हे तर प्रत्येक महाविद्यालयातून संशोधन होण्याची गरज आहे. 

समाजातील बदलांचा खरेतर तरुणाईवर लवकर आणि जबरदस्त पगडा बसतो. कोणताही संघर्ष न करता प्राप्त झालेले सुख, अल्पवयात हाती आलेली बाईक, कधी चांगला तर बहुतांश वाईट परिणाम करणारा मोबाईल, त्यावरील सोशल मीडियाचा आणि चित्रपटातील दृष्यांचा प्रभाव दैनंदिन जीवनावर पडला नाही तरच नवल. स्वाभाविकत: या अनियंत्रित सोशल मीडियामुळे तरुणाईही अनियंत्रित झालीय. मोठ्या रेसर बाईक, त्यावर ट्रीपलसीट, हाती मोबाईल घेत ‘सेल्फी’श झालेली तरुणाई या गोष्टींना प्रतिष्ठा मानू लागलीय. ही सर्व दृष्य नियमांचे उल्लंघन करणारीच आहेत, तरीही डोळ्यांदेखत होत असतानाही पोलिस मात्र त्यांना हटकायला तयार नाहीत. हटकले तरी, त्यातील कुणीतरी कुण्यातरी लोकप्रतिनिधीला ‘कॉल’ करणार अन्‌ कारवाई थांबणार... हेदेखील ठरलेले. 

फार पूर्वी नाही, पण.. साधारण दोन- तीन दशकांपूर्वी शाळा- महाविद्यालयांमध्ये काही शिक्षकांना विद्यार्थी थर्रर्र घाबरायचे... असे शिक्षक समोर आले तरी, वाट बदलून घ्यायचे.. वडील नोकरीवरून परतायच्या वेळेआधी मुलं घरात चुपचाप अभ्यास करत बसायचे.. अगदी गल्लीतही खेळताना शेजारचे काका-मावशी रागावतील म्हणून दचकायचे... रस्त्यावरून येता-जाताना पोलिस दरडावेल म्हणून गुमानं नियम पाळत जायचे... संस्कार, शिस्तीचा आणि कायद्याचाही हा धाक आता संपलांय. शनिवारची मू. जे. महाविद्यालयातील घटना हा धाक संपल्याचाच परिपाक म्हणावा लागेल. हा धाक संपला म्हणूनच समाजातलं भय संपायला तयार नाही. त्यासाठी पोलिस, शिक्षण यंत्रणाच नव्हे तर कुटुंबातील वातावरण आणि समाजाची मानसिकताही बदलावी लागेल..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Sachin Joshi