गोदाकाठी भरली कलावंत, कलाप्रेमींची जत्रा..!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

नाशिक : भाविक-पर्यटकांच्या गर्दीतून पुरातन व ऐतिहासिक महत्व असलेल्या मंदिरांचे नयनरम्य दृष्य टिपणारे नामांकित चित्रकार. गोदाकाठची श्रीमंती कॅनव्हासवर उतरविण्यात दंग झालेले चित्रकार. तबलावादक सुभाष दसककर यांच्या शिष्यांतर्फे तबला, संवादिनी वादनातून निर्माण झालेले उत्हासपूर्ण वातावरण. अन्‌ पथनाट्य या अभिनय कलेतून वाहतुक नियमांविषयी केलेली जनजागृती. कलावंत अन्‌ त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कलाप्रेमींची जत्रा गोदाकाठी भरली होती. औचित्य होते 'सकाळ'तर्फे यशवंतराव महाराज पटांगण येथे आयोजित 'सकाळ-कलांगण' उपक्रमाचे.

'सकाळ-कलांगण'च्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमास कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. या प्रसंगी 'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, विजयाताई कुलकर्णी, 'निमा'चे सरचिटणीस डॉ. उदय खरोटे, 'बॉश'कंपनीचे एचआर विभागाचे व्यवस्थापक मुकुंद भट, सुयश हॉस्पिटलचे डॉ. हेमंत ओस्तवाल, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, भि. रा. सावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत, सुलेखनकार नंदु गवांदे आदी उपस्थित होते.

नेहमीच पर्यटकांची वर्दळ असलेल्या या परीसरात 'सकाळ-कलांगण' हा उपक्रम अधिकच बहरला होता. सकाळच्या गारव्यातही चित्रकारांनी हजेरी लावत आपआपल्या दृष्टीने गोदा तीराचे सौदर्य कॅनव्हासवर आणण्याच्या कामाला सुरवात केली. यावेळी प्रसिद्ध तबलावादक सुभाष दसककर यांच्या शिष्यांनी सादरीकरण केले. तर विनोद राठोड लिखित व दिग्दर्शित 'पाळा..पाळा...वाहतुकीचे नियम पाळा' या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. नाशिककर कलाप्रेमी, पर्यटकांमध्ये या उपक्रमाविषयी भुरळ पहायला मिळाली.
 

Web Title: artists get together on the bank godavari at nashik