इच्छुकांकडून पैठणीच्या वाणाला पसंती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

इच्छुकांच्या वाणातील नावीन्य 
- पैठणी, साड्यांचे वाटप 
- धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या सहली 
- जिओ सिमचे वाटप 
- डायरीचे वाटप 
- दिनदर्शिकांचे वाटप 
- गृहोपयोगी वस्तूंचे वाटप, ज्यात उमेदवारांची माहिती 

नाशिक - पतिराजांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त सुवासिनींना वाण देण्याची प्रथा आहे. यंदा मात्र मकरसंक्रांतीदरम्यान निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने वाण देताना मते लुटण्याची अफलातून कल्पना इच्छकांकडून अंमलात आणली जात असल्याचे चित्र आहे. 

आपल्या वॉर्डात नगरसेवक म्हणून कोण इच्छुक आहे, त्याच्या माहितीसाठी होणाऱ्या प्रभातफेऱ्या, घरोघरी प्रचार, अशा कल्पना इच्छुकांकडून लढविल्या जातात. निवडणुकीच्या धामधूमीत मकरसंक्रांत आल्याने घरोघरी होणाऱ्या हळदी-कुंकवाच्या समारंभात इच्छुकांची वर्णी लागते आहे किंवा इच्छुकांकडून परिसरात भव्य हळदी-कुंकू समारंभही होत आहेत. यात परिसरातील महिलांना आपल्या उमेदवारीबाबत व प्रभागातील समस्या सोडविण्यास आपण कसे समर्थ आहोत किंवा समस्या कोणत्या यावर चर्चा होताना दिसते. यात प्रामुख्याने वाण लुटणे, यात मतांना टार्गेट केल्याचे दिसते आहे. प्रामुख्याने साड्यांना पसंती दिली जात आहे. पैठणी, सेमी पैठणी, नऊवारी, सहावारी अशा विविध साड्या इच्छुकांकडून महिलांना वाटण्यात येताहेत. होलसेल विक्रेत्यांकडून याबाबत साड्या खरेदीही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतेय. गृहोपयोगी वस्तू ज्यावर उमेदवाराची माहिती आहे किंवा दिनदर्शिका, डायरी, मोबाईल सिम, पॅनकार्ड आदींचे शिबिर घेण्यात येत आहे. ज्येष्ठांना सहलीची तिकिटे देण्यात आली आहेत. 

Web Title: aspirants preferred paithani for election