ज्योतिषशास्त्राची ‘बाराखडी’ही झाली डिजिटल!

सचिन जोशी
बुधवार, 31 जुलै 2019

‘यू-ट्यूब’वर धडे, ‘फेसबुक’वर नोट्‌स
प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्राची ‘बाराखडी’ शिकविणे सुरू केले. त्यासाठी ‘यू-ट्यूब’वर दररोज पंधरा मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला. त्यात ज्योतिषशास्त्राच्या ‘अ ब क ड’पासून मार्गदर्शन केले. असे ५० दिवस ५० व्हिडिओद्वारे वर्ग घेतले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित नोट्‌स फेसबुकवर शेअर केल्या. यादरम्यान कोर्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे १२ व्हॉटस्‌ॲप ग्रुप करून त्यावर अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना येणाऱ्या शंका, प्रश्‍नांचे व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून निरसन केले.

जळगाव - बदलत्या तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रे व्यापलेली असताना शिक्षण क्षेत्रातही त्या माध्यमातून आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. ज्ञानार्जनाचा भाग आणि अलीकडे विशेष महत्त्व प्राप्त झालेल्या ज्योतिषशास्त्रानेही मग ‘टेक्‍नोसेव्ही’ का होऊ नये? जळगावातील संस्थेने ज्योतिषशास्त्राचे धडे देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत प्रवेशापासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ‘डिजिटल’ पद्धतीने राबवून वेगळे उदाहरण घालून दिले आहे. 

जळगावातील व्यावसायिक ज्योती जोशी यांना ज्योतिषशास्त्राबद्दल कुतूहल होते, त्यातून त्यांनी त्याचे धडे गिरविले. २० वर्षांपासून त्या ज्योतिषशास्त्राची सेवा करीत आहेत. त्यातूनच त्यांनी श्री वैदिक व वैज्ञानिक ज्योतिष संशोधन केंद्र सुरू केले. ज्योतिषशास्त्राचा योग्य पद्धतीने प्रचार व प्रसार व्हावा म्हणून त्या प्रयत्नशील आहेत. 

‘डिजिटल’ अभ्यासक्रम
आपल्याकडील ज्ञान इतरांनाही मिळावे म्हणून त्यांनी चार महिन्यांपूर्वी ज्योतिषशास्त्राचा डिजिटल अभ्यासक्रम विकसित केला. या कोर्सविषयी त्यांनी सुरवातीला फेसबुकवर माहिती दिली. त्याबद्दल विचारणा झाल्यानंतर त्यांनी कोर्ससाठी अर्जही ऑनलाइन पद्धतीने मागविले. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी केली आणि या कोर्ससाठी जवळपास १८३४ जणांचे प्रवेश निश्‍चित केले. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे.

चाचणीही ऑनलाइन
५० व्हिडिओ वर्ग झाल्यानंतर ज्योती जोशी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला आणि या प्राथमिक अभ्यासावर दोन तासांची चाचणी (टेस्ट) घेतली. ही चाचणीदेखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यात १४०० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. ज्योतिषशास्त्रातील हा पहिल्या टप्प्यातील कोर्स ६ महिन्यांचा आहे. आता दोन महिने पुन्हा वर्ग होऊन नंतर या पहिल्या टप्प्यातील कोर्सची परीक्षा होईल. आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जातील.

विदेशातूनही विद्यार्थी 
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांमध्ये केवळ जळगाव, खानदेशच नव्हे तर महाराष्ट्र, देशभरातून आणि विशेष म्हणजे जर्मनी, अमेरिका, दुबईतील काही ज्योतिषप्रेमींचाही समावेश आहे. ज्योतिषशास्त्राचे मोफत धडे देऊन त्याचा प्रचार व प्रसार करणे हा उद्देश असल्याचे ज्योती जोशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Astrology Barakhadi Digital Jyoti Joshi