"एटीएम' कॅशबॉक्‍सला हात लावताच धडकले पोलिस 

atm machine jalgaon
atm machine jalgaon

जळगाव : महापालिका इमारतीसमोरील नाथप्लाझा कॉम्प्लेक्‍समधील स्टेट बॅंकेचे "एटीएम' भामट्याने फोडले. मशिन फोडून कॅशबॉक्‍स उघडण्यापूर्वीच सेन्सर ऍलर्ट प्रणालीने स्टेट बॅंकेच्या हैदराबाद नियंत्रण कक्षाला संदेश दिला... हैदराबादहून शहर पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिल्यावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ "एटीएम' गाठले.. त्यातून मास्क बांधलेल्या अवस्थेत बाहेर पडलेल्या चोरट्याला रंगेहाथ अटक केली असून, त्याच्याकडून एटीएम फोडण्याची हत्यारे जप्त केली आहेत. 

नाथप्लाझा कॉम्प्लेक्‍समध्ये भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम यंत्र आहे. रविवारी (ता.17) मध्यरात्रीनंतर सोमवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास चोरट्याने एटीएम पूर्णत: उघडून टाकले आणि कॅशबॉक्‍स उघडण्यापूर्वीच हैदराबाद येथे कळाल्यावर हैदराबाद येथून शहर पोलिस ठाण्याचा दूरध्वनी खणखणला. ठाणे अंमलदार नीलेश बडगुजर यांनी दूरध्वनी घेतल्यावर त्यांना घटना कळविल्यावर गस्तीवर असलेल्या गजानन बडगुजर, भास्कर ठाकरे दोन्ही कर्मचारी काही वेळातच घटनास्थळावर धडकले. पोलिसगाडीचे लाइट एटीएममधून दिसल्यावर चोरटा सावध होऊन लगेच बाहेर पडत असताना पोलिसांनी चौकशी करून त्याला ताब्यात घेतले. तोंडाला मास्क बांधलेला, पाठीवर बॅग असलेल्या व्यक्तीची विचारपूस केल्यावर त्याने मी, मुंबईला जात आहे... पैसे काढण्यासाठी आलो होतो...पण, मशिन हॅंग झाल्याने पैसे निघाले नाहीत, असे सांगितले. 

पोलिसांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात 
गस्तीवरील भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर या दोघा कर्मचाऱ्यांना संदेश मिळताच त्यांनी इतर कामे सोडून तत्काळ एटीएम गाठले. पोलिस आल्याची चाहूल लागताच चोरटा बाहेर पडला, त्याचे मोबाईल फोटो काढून घेत त्याला थांबवून व्यवस्थित चौकशी करण्यात आली. त्याच्या हातात स्टेट बॅंकेचे एटीएम कार्ड होते, तोंडावरील मास्कबाबत विचारल्यावर रेल्वेने मुंबई निघालोय थंडीसाठी लावल्याचे तो म्हणाला. संशय आल्याने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. निरीक्षक अरुण निकम यांनी संशयिताची कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव विजय बन्सी अहिरे (रा. खेडी बुद्रूक, ता.जळगाव) असल्याचे सांगितले. 

बॅगेत अवजारांसह दारू 
विजय अहिरे याच्या पाठीवरील बॅगची झडती घेतल्यावर त्यात टिक्‍सोटेप, हातोडी, टॉमी, मल्टिपल युज्ड स्क्रू ड्रायव्हर, ग्रीपर, बांधकाम टाइल्स कापण्यासाठी वापरातील हॅण्ड कटर मशिन, छोटा चाकू अशा अवजारांसह बॅगेत मास्टर ब्लेंड, ऑफिसर्स चॉईस दारूच्या दोन बाटल्या असे साहित्य मिळून आले असून, पोलिसांनी रीतसर पंचनामा करून हे साहित्य जप्त केले आहे. 

गुन्हा दाखल 
स्टेट बॅंकेचे एटीएम चॅनेल मॅनेजर श्रीकृष्ण अनंत करंदीकर यांनाही रविवारी रात्री संबंधित संदेश प्राप्त झाला होता. त्यानुसार त्यांनी आज सकाळी एटीएम इंजिनिअर राहुल संतोष पाटील व विशाल श्रावण सपकाळे यांच्यासोबत नाथाप्लाझामधील एटीएमची पाहणी केली. यात एटीएमचे तोडफोड केल्याने 3 लाखांचे नुकसान झाल्याचे आढळले. करंदीकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दर आठवड्याला एटीएममध्ये 12 लाखांची रोकड टाकली जाते. यावेळी एटीएममध्ये जास्त रोकड शिल्लक नव्हती. 

कर्ज फेडण्यासाठी फोडले एटीएम 
पोलिसांनी अटक केलेल्या विजय अहिरेची चौकशी केल्यावर त्याने तीन लाखांचे कर्ज आहे, हातउसनवारीही वाढली असून, कामधंदा नसल्याने कर्ज देणाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. परिणामी, झटपट पैसे मिळवून कटकट मोडण्यासाठी एटीएम फोडण्याचे खूळ डोक्‍यात भरले. एटीएमसंदर्भात येणाऱ्या बातम्या बघून एटीएमच्या रचनेचा अभ्यास केला. टाइल्स कटर मशिन व इतर उपयुक्त अवजारे गोळा करून एटीएम फोडण्याचा प्लॅन रचल्याचे अटकेतील विजयने चौकशीदरम्यान सांगितले. 

इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी 
इंटरनेटशी कनेक्‍ट असलेल्या एटीएम यंत्राची सेन्सर प्रणाली कार्यान्वित असते. कॅशबॉक्‍स उघडण्यापूर्वी सेन्सर प्रणालीशी छेडखानी होताच संबंधित बॅंकेच्या नियंत्रणकक्षाला याचा संदेश पाठवला जातो. याची माहिती सहसा चोरट्यांना नसते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com