‘एटीएम’च्या शोधातच गेला रविवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

जळगाव - नोटाबंदी...नोटाबंदी...हा विषय गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू आहे. नोटाबंदी झाल्यापासून आर्थिक परिस्थिती बिघडली असून, बहुतांश बॅंकांच्या ‘एटीएम’समोर ‘तांत्रिक कारणामुळे एटीएम बंद’ असे फलक लागून आहेत. याच प्रकारचे चित्र आजही पाहावयास मिळाले. परिणामी नोकरदारांसह अनेकांचा आजचा रविवारही ‘एटीएम’च्या शोधातच गेला.

जळगाव - नोटाबंदी...नोटाबंदी...हा विषय गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू आहे. नोटाबंदी झाल्यापासून आर्थिक परिस्थिती बिघडली असून, बहुतांश बॅंकांच्या ‘एटीएम’समोर ‘तांत्रिक कारणामुळे एटीएम बंद’ असे फलक लागून आहेत. याच प्रकारचे चित्र आजही पाहावयास मिळाले. परिणामी नोकरदारांसह अनेकांचा आजचा रविवारही ‘एटीएम’च्या शोधातच गेला.
पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर सर्वत्र एक वेगळ्या प्रकारचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच २ डिसेंबरपासून पाचशे रुपयांची नोट पेट्रोलपंप, रेल्वे, एस.टी. महामंडळ, महावितरणमध्ये स्वीकारणे पूर्णतः बंद झाल्याने आणखीनच समस्या निर्माण झाली आहे. चलनात नवीन आलेली दोन हजार रुपयांची नोट जवळ असूनही सुट्या पैशांची समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी लग्नसोहळ्यात गेलेल्या मंडळींकडून वधू-वरांकडील आहेर नोंदवून घेण्याची यादी असलेल्या ठिकाणाहून सुटे केले जात होते. परंतु, रविवारमुळे पैसे काढणाऱ्यांना आज खूप त्रास सहन करावा लागला.

स्टेट बॅंकेचेच ‘एटीएम’ सुरू
रविवारची सुटी असल्याने बॅंकांचे कामकाज आज पूर्णपणे बंद असल्याने खात्यातून पैसे काढणे शक्‍य नव्हते. त्यामुळे पैसे काढण्यासाठी केवळ ‘एटीएम’चाच पर्याय होता. परंतु ते शोधण्यासाठी नागरिकांना चौका-चौकांमध्ये फिरावे लागले. कारण शहरातील जवळपास सर्वच ‘एटीएम’ मशिन आज बंद होते. स्टेट बॅंकेच्या जिल्हा क्रीडा संकुलासमोरील मुख्य शाखेतील एक एटीएम मशिन आणि नवीपेठ परिसरातील, शिवकॉलनी शाखेचे ‘एटीएम’ सुरू होते. या व्यतिरिक्‍त आयडीबीआय, ॲक्‍सिस बॅंक, एच.डी.एफ.सी., युनियन बॅंकेचे ‘एटीएम’ बंद होते. सर्व ‘एटीएम’बाहेर ‘तांत्रिक कारणास्तव मशिन बंद’ असे फलक लावलेले होते.

फिरल्यानंतर तासभर लांब रांगेत 
लग्नसोहळ्याची आज मोठी तिथी होती. अनेकजण लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी जाणार होते, तर बहुतेक जण जळगावातील लग्नसोहळ्यात हजेरी लावण्यासाठी आले होते. त्यामुळे ‘एटीएम’मधून पैसे काढणाऱ्यांची संख्या अधिक होती. कोणत्या ‘एटीएम’वर गर्दी कमी आहे, हे पाहण्यासाठी निघालेल्यांना जेथे जावे तेथे मशिन बंदचा फलक दिसत होता. स्टेट बॅंकेच्या मशिनबाहेर असलेल्या लांब रांगेत उभे राहण्याचे टाळले जात होते. परंतु, ‘एटीएम’ पाहणे झाल्यानंतर लांब रांगेत किमान तासभर उभे राहण्याचीच वेळ अखेर अनेकांवर आली.

‘आयडीबीआय’त ग्राहकांची फरफट
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वाधिक दिवस बंद राहणारे ‘एटीएम’ म्हणून आयडीबीआय बॅंकेच्या केंद्राचा उल्लेख करावा लागेल. नेहरू चौक, स्वातंत्र्य चौक व आरटीओ कार्यालयाजवळ आयडीबीआय बॅंकेची एटीएम केंद्रे आहेत. मात्र, हे तिन्ही मशीन गेल्या महिनाभरापासून जवळपास बंदच आहेत. त्यातही नेहरू चौकातील मशीन एक-दोन वेळा सुरू असल्याचे आढळून आले. मात्र, तेही दोन-तीन तासांपुरतेच. सध्या स्थानिक सहकारी बॅंकांचे ‘एटीएम’ सुरू असतात, मग आयडीबीआय बॅंकेच्या ‘एटीएम’लाच काय ‘प्रॉब्लेम’ आहे, असा प्रश्‍न ग्राहकांमधून उपस्थित होत आहे. भरीस भर म्हणून काही बॅंकांच्या एटीएम मशीनवर आयडीबीआय बॅंकेचे कार्ड चालत नसल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत.

Web Title: atm searching for money