ढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला

ढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला

मनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक हरमनसिंग सेखो व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची गंभीर घटना आज घडली. या घटनेमुळे ग्रामस्थ व ग्रामसेवक संघटनेमध्ये संतापाची लाट आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ढाबा मालक व त्याच्या साथीदारावर सरकारी कामात अडथळा आणणे सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे तसेच अट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान ग्रामसेवक संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाडपासून जवळ असलेल्या अनकवाडे ग्रामपंचायत हद्दीत फौजी ढाबा या नावाचा ढाबा व पेट्रोल पंप आहे. याचे काही काम अनधिकृतपणे करण्यात आल्याची तक्रारी आल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी आज गुरूवारी ग्रामसेवक अमोल आहिरे, विस्तार अधिकारी श्री ढवळे व ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी गेले. ढाबा मालक हरमनसिंग सेखो व त्याच्या साथीदारांनी पाहणी करण्यास मज्जाव तर केलाच शिवाय जातीयवाचक शिवीगाळ करून ग्रामसेवक अमोल आहिरे यांना मारहाण केली. हा प्रकार घडत असतांना विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता यासर्वांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यामुळे हे सर्वजण घाबरले व त्यांनी मनमाड पोलीस स्थानकात धाव घेतली. मात्र येथे आल्यानंतर आमची फिर्याद घेण्याऐवजी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी आरोपींची बाजू घेत आम्हाला उपदेशाचे डोस पाजण्यास सुरवात केल्याचे ग्रामसेवक व ग्रामस्थांनी सांगितले. 

आमची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक रागसुधा आर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तातडीने पोलीस स्थानकात येऊन आमची फिर्याद घेण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना सांगितले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्या नंतर घुसर यांनी आमची फिर्याद घेतल्याचे ग्रामसेवक ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 

या प्रकरणी फौजी ढाबा मालक हरमनसिंग सेखो, ज्ञानेश्वर खेमणार, जसविंदर सिंग, विक्की लाली, आणि संजू यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे (353), जातीयवाचक शिवीगाळ करणे (अट्रोसिटी), यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून हरमनसिंग यांच्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक रागसुधा आर करीत आहे. 

दरम्यान या घटनेमुळे ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली असून शासकीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशी मारहाण केली जात असेल तर आम्ही काम करावे तरी कसे असा प्रश्न ग्रामसेवकांनी उपस्थित केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींना कडक शासन करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे. 

अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी आमचे वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांसोबत गेलो असता ढाबा मालक हरमनसिंग सेखो व त्याच्या साथीदारांनी चौकशी, पाहणी करण्यास मज्जाव तर केलाच पण मला मारहाण करत जातीवादी शिवीगाळ केली ग्रामस्थांना जीवे मारण्याची धमकी दिली सर्व ग्रामस्थांसह पोलिसात जात गुन्हा दाखल केला आहे. - अमोल आहिरे ग्रामसेवक अनकवाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com