गर्भपात करण्यास नकार दिल्याने सटाण्यात विवाहितेस जाळून ठार मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत पतीने तिचा दीर व सासऱ्याच्या मदतीने अंगावर पेट्रोल टाकत तिला जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सटाणा येथे शुक्रवार (ता. 23) रोजी मध्यरात्री घडली.

सटाणा - गर्भपात करण्यास नकार दिल्याने येथील दिपाली विलास कुमावत (महिलेचे पहिले नाव बदललेले आहे) (वय 24) या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत पतीने तिचा दीर व सासऱ्याच्या मदतीने अंगावर पेट्रोल टाकत तिला जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सटाणा येथे शुक्रवार (ता. 23) रोजी मध्यरात्री घडली. या घटनेत रुपाली कुमावत या 55 टक्के भाजल्या असून गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सटाणा पोलिसात पती, सासरा व दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सटाणा शहरातील मालेगाव रस्त्यावरील अंबिकानगरमध्ये वास्तव्यास असलेले कुमावत कुटुंबिय बांधकाम व्यवसाय करतात. दशरथ कुमावत यांचा मोठा मुलगा विलास कुमावत याची पत्नी पाच महिन्यांची गर्भवती होती. मात्र कुमावत कुटुंबियांना हे मुल नको होते, त्यामुळे विलास सातत्याने पत्नी दिपालीला मारहाण करून गर्भपात करण्याचा दबाव टाकत असे. परंतु दिपालीला गर्भपात करण्याची इच्छाच नसल्याने ती पतीला विरोध करायची. शुक्रवार (ता. 23) रोजी मध्यरात्री विलासने पत्नी दिपालीला शिवीगाळ करत मारहाण केली. मात्र तरीही तिने गर्भपात करण्यास नकार देत असल्याचा राग येऊन विलासने तिला पुन्हा लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत रुपाली जखमी झाली. याचवेळी दीर योगेश कुमावत याने पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या दिपालीच्या अंगावर पेट्रोल टाकले तर विलासने काडीपेटीतील काडीने तिला पेटवून दिले. या घटनेत दिपाली 55 टक्के भाजली असून गंभीर जखमी झाली आहे. तिला तात्काळ नाशिक येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तिच्या तक्रारीवरून सटाणा पोलिसांनी पती विलास दशरथ कुमावत, दीर योगेश दशरथ कुमावत व सासरा दशरथ गंगाधर कुमावत या तिघांविरोधात पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तिघेही आरोपी फरार झाले असून सटाणा पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश बुवा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: An attempt to burn a woman because of refusing to abort