जीपला बांधून एटीएम पळवत होते, ग्रामस्थांनी दरोडेखोरांनाच पळवून लावले (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

शिरूड गावात ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे दरोडेखोरांचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. दरोडेखोरांना तेथून पळ काढावा लागला. 

धुळे : शिरूड (ता. धुळे) येथे तीन ते चार दरोडेखोरांनी एटीएमवर सिनेस्टाईल घातलेला दरोडा सतर्क ग्रामस्थांमुळे अयशस्वी ठरला. दरोडेखोरांनी ग्रामस्थांवर दगडफेकही केली. नंतर आरडाओरडीतून ग्रामस्थांचा जमाव झाल्यावर दरोडेखोरांना पळून जावे लागले. त्यामुळे एटीएम यंत्रासह त्यातील सुमारे पाच लाखांवरील रोकड सुरक्षित राहिली. शिरूड येथे शनिवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या वेळेत ही घटना घडली.

प्रदीप शर्मांना शिवसेनेकडून मिळू शकते मंत्रिपद

शिरूड येथे बाजारपेठेत सेंट्रल बँकेचे 'एटीएम' आहे. त्यात 'सीसीटीव्ही'मुळे तीन ते चार दरोडेखोर चेहरे झाकून शिरले. त्यांनी "एटीएम'चे यंत्र कापून नेण्याचा प्रयत्न केला. तो सफल न झाल्याने दरोडेखोरांनी लोखंडी साखळीने एटीएम यंत्र हे बोलेरो कारला बांधले. याद्वारे ते ओढून नेत असताना यंत्र खाली पडताना मोठा आवाज झाला. त्यावेळी काही ग्रामस्थांना अपघात झाला असावा असे वाटले. एका ग्रामस्थाने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा "एटीएम' यंत्र वाहनाव्दारे ओढून नेत असल्याचे दिसले. त्याने आरडाओरड केली. त्यामुळे काही ग्रामस्थ मदतीसाठी धावले. या स्थितीत दरोडेखोरांनी ग्रामस्थांवर दगडफेक सुरू केली. ग्रामस्थांचा जमाव वाढत असल्याचे पाहून वाहनाला बांधलेले "एटीएम' यंत्र दरोडेखोरांनी सोडविले व ते वाहनाने पळून गेले.

कथोरेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी लॉबिंग

एका खड्ड्यालगत "एटीएम' यंत्र अडकल्याने दरोडेखोरांना ते पळवून नेता आले नाही. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तोपर्यंत काही ग्रामस्थांनी दूरध्वनी केल्याने तालुका, मोहाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सेंट्रल बॅंकेच्या व्यवस्थापकांकडून तालुका पोलिस ठाण्यात दुपारनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. धुळे शहरात काही महिन्यांपूर्वी वर्दळीच्या मालेगाव रोडवर "आयसीआयसीआय' बॅंकेचे "एटीएम' पळवून नेण्याचा यशस्वी प्रयत्न दरोडेखोरांनी केला होता. टोल नाका चुकवत त्यांनी नाशिकच्या दिशेने "एटीएम' यंत्र नेले होते. त्याचे अवशेष मालेगाव तालुका परिसरातील निर्जनस्थळी सापडले होते. सिनेस्टाईल अशा दरोड्यामुळे जिल्हा पोलिसांपुढील आव्हान वाढले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt of Robbery failed due to Villagers in Dhule district