औंदाणे शिवारात बिबट्यासह दोन बछड्यांच्या दर्शनाने घबराट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सटाणा - शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवरील औंदाणे शिवारात विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गालगत शेतामध्ये आज सायंकाळी सातला बिबट्या व दोन बछड्यांनी दर्शन दिले. गेल्या दोन दिवसांपासून औंदाणे शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याची चर्चा होती. आज मात्र दिवेलागणीला घरी परतणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. 

विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतमळ्यांमध्ये शेतकरी वस्ती करून राहतात. या शिवारालगत तरसाळी, आव्हाटी, औंदाणे, वनोली, भंडारपाडे या शिवारात वन विभागाने वनीकरणाचे मोठे काम केले असून, वनराईमुळे वन्यप्राण्यांचा मोठा वावर या परिसरात वाढला आहे. आव्हाटी जंगलातून उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ बिबट्या मानवी वस्तीवर आल्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. आज मात्र आव्हाटी जंगलापासून दूर अंतरावर सटाणा शहरानजीक बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. आज सायंकाळी सातच्या दरम्यान अरुण खैरनार व सुबळ कुमावत यांच्या शेतामध्ये बिबट्या आपल्या दोन बछड्यांसह फिरताना दिसून आला. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक शेतकऱ्यांनी त्वरित या घटनेची माहिती सटाणा वनपरिक्षेत्र विभागास कळविली. 

वनवि भागाचे कर्मचारी कृष्णा काकुळते, एम. बी. शेख व आर. के. बागूल यांनी तत्काळ औंदाणे शिवारात जाऊन शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी आमच्या शेतात बिबट्या दिसल्याचेही काही स्थानिक शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. सध्या शेतांमध्ये उन्हाळ कांदालागवड व रब्बी पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी देणे भाग पडते. या बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरातील शेतकरी मात्र कमालीचे धास्तावले असून, वन विभागाने तत्काळ या परिसरात पिंजरा लावून दिलासा द्यावा, अशी मागणीही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: aundane Shivar Leopard