औरंगाबाद-अहवा रस्त्याने प्रवास करणार असाल तर सावधान.. 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

नामपूर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर काही ठिकाणी रस्त्यात खड्डे पडले असून त्यात पाण्याचे डबके साचले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकामी दखल रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी युवक काँग्रेस पदाधिकारी यांनी केली आहे, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नामपूर : यंदा मोसम परिसरात झालेल्या पावसाने जवळपास सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. औरंगाबाद अहवा राज्यमार्ग अतिशय खराब झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बाभुळणे ( ता बागलाण ) येथील विघ्नहर्ता अनुदानीत खासगी आश्रमशाळेजवळील फरशी पुलालगतचा भराव वाहून गेल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर काही ठिकाणी रस्त्यात खड्डे पडले असून त्यात पाण्याचे डबके साचले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकामी दखल रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी युवक काँग्रेस पदाधिकारी यांनी केली आहे, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

साइड पट्टयांवर गवत असल्याने वाहतूकीस अडथळा
बाभुळणे, अलियाबाद, मुल्हेर आदी ठिकाणी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यादरम्यान अनेक ठिकाणी साइड पट्टयांवर गवत असल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. आदिवासी भागातून जाणारा व गुजरात राज्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून अहवा रस्ता ओळखला जातो. रस्त्यावरील खड्डयांच्या साम्राज्यमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी अनेकदा या रस्त्यावर झालेल्या अपघातात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे. रस्त्यावर गतिरोधक व साइडपट्टयावर तुरळक ठिकाणी पांढरे पट्टे मारले आहेत. रस्त्यावर असणारे दिशादर्शक फलक गायब झाल्याने प्रवासी वर्गाची दिशाभूल होत आहे. मोसम खोऱ्यात नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्यांच्या साइडपट्टया तसेच अनेक खड्डय़ांमध्ये टाकण्यात आलेली माती आणि रस्त्यांवरील डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे उघडे पडले आहेत. काही रस्त्यांवरून जाताना शेतातून वाहून आलेली माती साचलेली असून अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असल्याने दुचाकीस्वारांची तारांबळ होत आहे. 

 सार्वजानिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज
कोट्यावधी रूपये खर्चुनही पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकामी तातडीने लक्ष घालून रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार, धुळे लोकसभा युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन कोठावदे, किशोर भामरे, किशोर कदम, अतुल चित्ते, दीपक कांकरिया, प्रदीप भामरे, प्रदीप देवरे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत, सुरेश कंकरेज, शरद पवार, योगेश घांगुर्ड, अरुण पाटील, कमलाकर सोनवणे, आदींनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad becomes a dangerous highway due to rain