कोण कोणाला दाखविणार ‘पाणी’?

एल. बी. चौधरी
सोमवार, 3 डिसेंबर 2018

धुळे - महापालिका हद्दीत आलेले अवधान हे विकासकामांबाबत अग्रेसर गाव असून, पिण्याच्या पाण्याची समस्या वगळता बहुतांश विकासकामे झाली आहेत. गावालगतच्या ‘एमआयडीसी’, शहरीकरणामुळे ते यापूर्वीच शहराशी एकरूप झाले आहे. एका अर्थाने मोहाडीसारखे उपनगरच बनले आहे.

धुळे - महापालिका हद्दीत आलेले अवधान हे विकासकामांबाबत अग्रेसर गाव असून, पिण्याच्या पाण्याची समस्या वगळता बहुतांश विकासकामे झाली आहेत. गावालगतच्या ‘एमआयडीसी’, शहरीकरणामुळे ते यापूर्वीच शहराशी एकरूप झाले आहे. एका अर्थाने मोहाडीसारखे उपनगरच बनले आहे.

राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या या गावात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व नसले, तरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोर लावला आहे. इतर पक्षांनीही प्रचारास वेग दिला आहे. बरखास्त झालेल्या ग्रामपंचायतीला मोठा कर मिळत असल्याने ग्रामस्थांनी महापालिका हद्दीत समावेशास मोठा विरोध केला होता. आता समावेशानंतर विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थही महापालिका निवडणुकीत उत्साहाने सहभागी झाले आहेत.

३१५० मतदारांवर भवितव्य
अवधानचा समावेश प्रभाग १८ मध्ये होतो. याशिवाय मोहाडी उपनगर, चक्करबर्डी, समतानगर, संजीवननगर व मालेगाव रोड परिसरही त्यात येतो. १३ सदस्यीय बरखास्त ग्रामपंचायतीचे अवधानमध्ये सुमारे ३१५० मतदार आहेत. बरखास्तीवेळी सरपंचपदी सुरेश मधुकर भदाणे व उपसरपंचपदी शालिग्राम लोटन सोनवणे कार्यरत होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरापासून सुमारे साडेतीन किलोमीटरवर असलेल्या या गावात दुतर्फा ढाबे, पेट्रोलपंपांसह गॅरेज, दुचाकी, चारचाकी वाहनांचे शोरूम, तसेच ऑइल मिलसह विविध उद्योग आहेत.

वर्चस्वासाठी पक्षांचे प्रयत्न 
गावात कोणत्याही पक्षाचे वर्चस्व नसल्याने प्रत्येक उमेदवाराने मोठा जोर लावला आहे. सर्वपक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यात गावातील पदाधिकारी व युवा वर्गही उत्साहाने सहभागी होत आहेत. आपापल्या उद्योगात मग्न ग्रामस्थांमध्ये पहिल्या निवडणुकीबाबत कमालीचे औत्सुक्‍य आहे. गावातील मध्यवस्तीतील महादेव मंदिराजवळ काही ज्येष्ठ नागरिकांची निवडणुकीविषयी जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र, कुठल्याही पक्षाचा अभिनिवेश नाही. सर्वच उमेदवार पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन देत आहेत. सर्वच पक्षांना समान संधी असल्याने निवडणुकीत प्रचंड चुरस आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसा मतदारांचा उत्साहही वाढत आहे. 

लोकप्रतिनिधींकडून वाढत्या अपेक्षा
गावात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न आहे. सध्या गावात नळ योजना कार्यान्वित आहे. पण पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने ते पिण्यासाठी वापरले जात नाही. पिण्याच्या पाण्यासाठी गावात एकाच ठिकाणी पाच स्टॅंडपोस्ट (नळ) आहेत. सारे ग्रामस्थ तेथूनच पाणी भरतात. त्यामुळे महिलांचा बराचसा वेळ पाणी भरण्यात जातो. यामुळे जो उमेदवार पाणी प्रश्न सोडवू शकतो असे मतदारांना वाटते त्याच्या पाठीशी राहू, असे ग्रामस्थ सांगतात. यामुळेच सर्व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर येथील पाणीप्रश्‍न पहिल्या क्रमांकावर आहे. मतदार मात्र जागरूक असून, ते कोणाच्या आश्‍वासनावर विश्वास ठेवतात, यावरच निकाल अवलंबून असेल.

या निवडणुकीनंतर गावाचा पाणीप्रश्‍न हमखास सुटेल, हा विश्‍वास मात्र कायम आहे. प्रमुख उमेदवारांत ईश्वर पवार, सुभाष मोरे, पद्माकर सोनवणे, दगडू बागूल, आशाबाई गर्दे, राजश्री शिंदे, सुरेखा देवरे, सारिका अग्रवाल, शोभा भदाणे, सविता शिंगाडे, नीलम वोरा, कुणाल पवार, संदीप शिंदे, कैलास शर्मा, राजेश पवार, विकास शिंगाडे, ज्ञानेश्वर पाटील या सर्वपक्षीय, अपक्षांचा समावेश आहे. 

सुरेश मधुकर भदाणे (माजी सरपंच) - महापालिका हद्दीत समावेशानंतर गावाचा पाणीप्रश्‍न कायमचा सुटावा. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. निवडणुकीनंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न व्हावेत. 

रणजित दगाजीराव भदाणे (सामाजिक कार्यकर्ते) - आमच्यासाठी होणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे स्वागत आहेच. लोकप्रतिनिधींनी गावाच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्यावे. ‘एमआयडीसी’ असूनही स्थानिक युवकांच्या हाताला काम नाही. पाणीटंचाईचा प्रश्‍न जटिल आहे. तो सुटावा.

Web Title: Avdhan Village Development Municipal Area Politics