
Nandurbar News : आयान कारखान्याकडून 10.61 लाख टन उसाचे गाळप
नंदुरबार : तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टिट्रेड (Ayan Multitrade) साखर कारखान्याने १०.६१ लाख टन उसाचे गाळप करून हंगाम समाप्तीची घोषणा केली. जिल्ह्यातील कारखान्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक गाळप झाले आहे.
साखरनिर्मिती प्रक्रिया अजून दोन दिवस सुरू राहील, अशी माहिती आयान कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली. (Ayan Multitrade Sugar Factory by crushing 10 61 lakh tonnes of sugarcane nandurbar news)
याबाबत श्री. सिनगारे यांनी सांगितले, की कारखान्याने गाळप हंगाम २०२२-२३ अंतर्गत दहा लाख ६१ हजार २७१ टन उसाचे गाळप केले. हंगामातील पहिली उचल दोन हजार ३५० रुपये प्रतिशेतकऱ्याला अदा करण्यात आली. चालू हंगामातील ऊस गाळपापोटी आतापर्यंत शेतकऱ्यांना २०६ कोटी ५३ लाख रुपये अदा करण्यात आले. साखर उताऱ्यावर एफआरपीनुसार उर्वरित देयक अदा करण्यात येईल.
शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढावे यासाठी बियाण्यात बदल करण्यात आला असून, ठिबकचा वापर करणे तसेच अन्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. सुधारित जातीचे बियाणे पट्टा पद्धतीने लागवड करण्याबाबतदेखील मार्गदर्शन करण्यात येत आहे.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
या वर्षी पर्जन्यमानाचे विस्कळित रूप पाहता साखर उतारा कमी मिळाला, गाळपही कमी झाले. ही बाब लक्षात घेता आगामी कालावधीत नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
आयान कारखान्याला शेतकरी, ऊस उत्पादक, वाहतूकदार, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचे या वेळी श्री. सिनगारे यांनी सांगितले. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक पद्माकर टापरे, शेतकी अधिकारी ए. आर. पाटील, ऊस विकास अधिकारी माळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.