Sugarcane Crushing : आयानचे दहा लाख टन उसाचे गाळप; सर्वाधिक गाळप करणारा कारखाना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarcane crop

Sugarcane Crushing : आयानचे दहा लाख टन उसाचे गाळप; सर्वाधिक गाळप करणारा कारखाना!

नंदुरबार : समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याने (Ayan Sugar Factory) दहा लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. साखर उतारा १०.४० टक्के असून, दहा लाख २४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. (Ayan Sugar Factory at Samsherpur has completed crushing of 1 million tonnes of sugarcane nandurbar news)

मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात सर्वाधिक गाळप करणारा हा कारखाना ठरला आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक एस. एस. सिनगारे यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर टापरे, मुख्य शेतकी अधिकारी ए. आर. पाटील उपस्थित होते.

कारखान्याच्या गाळपाबाबत माहिती देताना श्री. सिनगारे म्हणाले, की कारखान्याची धुरा बारा वर्षांपासून श्री. टापरे सांभाळत आहेत. युनिटच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी बारकाईने लक्ष घातले. शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यासह कारखान्याशी संलग्न सर्व घटकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

यातून कारखाना अधिकाधिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमाभागात हा कारखाना आहे. कारखान्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून कमीत कमी दिवसांत अधिकाधिक ऊसगाळप आणि त्यातही साखर उतारा चांगला देण्याचा उच्चांक गाठला आहे.

कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता दोन हजार ३५० रुपये नियमित अदा केला आहे. शेतकरी आणि ऊसतोडणी मजुरांना २३१ कोटी रुपयांची पेमेंट अदा करण्यात आले आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

साखर आयुक्तांच्या औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांच्या यादीमध्ये उसाचा दर, वेळेत पेमेंट यामध्ये कारखाना सातत्याने वरच्या क्रमांकावर आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा हा कारखाना ठरला आहे. कामगार आणि मजुरांना रोजगार उपलब्ध करण्यातही मोठा हिस्सा आहे.

कारखान्यातर्फे कामगार मजुरांच्या मुलांसाठी साखरशाळा चालविली जाते. त्यात ३२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कामगारांचे हितही जोपासले जाते. कारखान्यात आधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. दररोज नऊ हजार टन ऊसगाळप केला जातो. उसाचे वजन घटल्यामुळे क्षमता आणि अपेक्षेप्रमाणे ऊसगाळप होत नाही.

त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी कालावधीमध्ये नोंदलेला, बिगरनोंदलेला सर्वच उसाचे गाळप करण्यात येणार आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्र वाढवावे, असे आवाहन श्री. सिनगारे यांनी केले.

"कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. सर्वाधिक ऊसगाळप करणारा हा कारखाना ठरला आहे. यात शेतकरी, कामगार, मजूर व सर्व संबंधितांचे सहकार्य लाभले आहे." -पद्माकर टापरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयान साखर कारखाना

टॅग्स :Nandurbarsugarcane