"अयोध्या' प्रकरणी...व्हॉट्‌स ऍप, आक्षेपार्ह व्हीडीओंकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

धुळे ः "अयोध्या' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील काही दिवसांत निकाल अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी फेसबुक, व्हॉट्‌स ऍप व आक्षेपार्ह व्हीडीओ, संदेश पोस्ट करणाऱ्या, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी आज दिल्या. 

धुळे ः "अयोध्या' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील काही दिवसांत निकाल अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी फेसबुक, व्हॉट्‌स ऍप व आक्षेपार्ह व्हीडीओ, संदेश पोस्ट करणाऱ्या, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी आज दिल्या. 
पोलिस अधीक्षक कार्यालयात डॉ. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांची आज सकाळी बैठक झाली. पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, साक्रीचे उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, शिरपूरचे उपअधीक्षक अनिल माने यांच्यासह जिल्ह्यातील प्रभारी निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक उपस्थित होते. आगामी काळात मुस्लिम बांधवांचा ईद-ए मिलाद सण आहे. शिवाय अयोध्या प्रकरणी काही दिवसांत निकाल लागण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून कोणत्याही बाजूने निकाल लागू शकतो. या निकालाचा सर्वांनी सन्मान राखावा. जातीय दंगलीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे जुने व्हीडीओ व फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नयेत, निकालानंतर फेसबुक व व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया टीका-टिप्पणी, पत्रकबाजी करणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल. न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, धार्मिक रंग देऊन जातीय तणाव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा सूचना डॉ. भुजबळ यांनी केल्या. 

नागरिकांनी सूचनांचे पालन करावे 
निकालानंतर नागरिकांनी गुलाल उधळू नये, पेढे, साखर व फटाके वाजवू नयेत, सायलेन्सर काढून वाहने पळवू नयेत, यासह घोषणाबाजी जल्लोष व मिरवणूक काढू नये. प्रत्येक हालचालींवर पोलिसांसह सायबर सेलचे लक्ष असेल. नागरिकांनी शांतता राखत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले. यावेळी सर्वधर्मीय नेते, लोकप्रतिनिधींनीही निर्णयाचा आदर राखून धुळे शहराच्या शांततेला गालबोट लागू देणारी नसल्याची ग्वाही दिली. यावेळी आमदार डॉ. फारुक शाह, महापौर चंद्रकांत सोनार, सर्वधर्मीय प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य व मोहल्ला समित्यांचे सदस्य उपस्थित होते. 

पोलिस बंदोबस्तात वाढ 
राज्यासह जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील भागांत कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार "एसआरपी'च्या सुमारे 200 जवानांसह गृहरक्षक दलाचे 900 जवान तैनात असणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodya result whatsapp vedio police baithak dhule