धनदांडग्यांच्या "धिंगाण्या'वर पोलिसांचा चाप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

इगतपुरी - तळेगाव (ता. इगतपुरी) शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल मिस्टिक व्हॅलीच्या परिसरात एका बंगल्यात सुरू असलेल्या "बॅचलर पार्टी'वर इगतपुरी पोलिसांनी रविवारी (ता. 26) मध्यरात्री छापा घालून चार युवती व नऊ तरुण अशा 13 जणांना अटक केली. हे सर्व जण उच्चभ्रू व प्रतिष्ठित घरातील आणि सुशिक्षित असून, त्यांच्याकडील रोकड, मुद्देमाल व मद्य जप्त करण्यात आले आहे. 

इगतपुरी - तळेगाव (ता. इगतपुरी) शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल मिस्टिक व्हॅलीच्या परिसरात एका बंगल्यात सुरू असलेल्या "बॅचलर पार्टी'वर इगतपुरी पोलिसांनी रविवारी (ता. 26) मध्यरात्री छापा घालून चार युवती व नऊ तरुण अशा 13 जणांना अटक केली. हे सर्व जण उच्चभ्रू व प्रतिष्ठित घरातील आणि सुशिक्षित असून, त्यांच्याकडील रोकड, मुद्देमाल व मद्य जप्त करण्यात आले आहे. 

महामार्गावर इगतपुरी शहरालगत तळेगाव शिवारात मिस्टिक व्हॅली हॉटेल परिसरातील 11 क्रमांकाच्या बंगल्यात इगतपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. या बंगल्यात काही तरुण-तरुणी मोठ्या आवाजात गोंधळ घालत असून, बारबालांसोबत पायात घुंगरू बांधून नाचत व पैसे उधळत असल्याची माहिती मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कुलकर्णी यांनी इगतपुरी पोलिसांना दिली. त्यानुसार इगतपुरीचे पोलिस निरीक्षक संजय शुक्‍ला यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री छापा घातला. या वेळी बंगल्यात अर्धनग्न अवस्थेतील मद्यधुंद तरुण-तरुणी अश्‍लील हावभाव करून व घुंगरू बांधून नाचत होते. काही जण तरुणींवर पैसे उधळत होते. विशेष म्हणजे, यात 10 रुपयांच्या काही नोटा बनावट होत्या. हा सर्व प्रकार तत्काळ थांबवत पोलिसांनी चार तरुणी व नऊ तरुणांना ताब्यात घेतले. बंगल्यातून पोलिसांनी 57 हजार रुपये रोख जप्त केले. त्यात तीन हजार 230 रुपयांच्या दहाच्या बनावट नोटांचाही समावेश आहे. याशिवाय पोलिसांनी मोटार (एमएच 02, सीआर 4366), लॅपटॉप, दारूच्या बाटल्या असा ऐवज जप्त केला आहे. 

या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी गणेश वराडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये बांधकाम व्यावसायिक पृथ्वीराज युवराज पवार (वय 28, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक) व सुमीत श्रीराम देवरे (वय 30), कौस्तुभ विश्‍वास जाधव (वय 27, रा. पवननगर, सिडको), व्यापारी सुशांत जिभाऊ गांगुर्डे (वय 31, रा. सावरकरनगर), वैद्यकीय व्यावसायिक ललित सुनील पाटील (वय 27, रा. मिथिलानगरी, पिंपरी चिंचवड), शब्बीर आजिम खान (वय 56, रा. काश्‍मिरा, मीनाक्षीनगर, ठाणे), जितनबी मोहम्मद हनिफ (वय 36, रा. वर्सोवा, अंधेरी वेस्ट, मुंबई), रजिया गुलाब शेख (वय 28, रा. मीरा रोड, मुंबई), अंजना महादेव मंडल (वय 31, रा. मीरा भाईंदर रोड, मुंबई), शहनाज युसुफ शेख (वय 30, मीरा रोड, मुंबई), चिन्नामा अंजिलिया दानिया (वय 24, रा. मिरा भाईंदर रोड, मुंबई), रहाना अब्दुल हाफिज (वय 31, रा. मालाड पश्‍चिम, मुंबई) व वाहन चालक धर्मेंद्रकुमार दिनेशकुमार सिंग (वय 32, रा. नेहरू रोड, सांताक्रूझ, मुंबई) यांचा समावेश आहे. 

विष तस्करीचे रॅकेट 
हॉटेल मिस्टिक व्हॅलीमध्ये चरस, गांजा, अफीमसह विषारी साप व नागाच्या विषाची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत सखोल चौकशी झाल्यास मोठे तस्करी रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

लैला खान हत्याकांडानंतर... 
इगतपुरी परिसराचे निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी व थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागात येतात. यापूर्वी लैला खानच्या बंगल्यावरही अशाच पार्ट्या रंगत होत्या. कालांतराने एक भयानक हत्याकांड घडले आणि अभिनेत्री असलेल्या लैलासह अन्य सात जणांचा कौटुंबिक वादातून याच भागात बळी गेला. त्या घटनेनंतर आज पुन्हा हा परिसर राज्यभर चर्चेत आला आहे. 

Web Title: bachelor party