शारीरिक व्याधींचे मूळ ठरतोय चाळीसगाव-मालेगाव रस्ता!

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 7 एप्रिल 2018

नूतनीकरणास आणखी लागणार काही महिने!
​चाळीसगाव- मालेगाव रस्त्याचे 'हायब्रीड ऍन्युइटी' योजनेचे काम नाशिक बांधकाम विभागाकडे आहे. रस्त्याची निविदा ही निविदा प्रक्रिया मुख्यालयातून मंत्रालयाच्या एका समितीकडे पाठविण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण व्हायला सुमारे सहा महिन्यांचा काळ लागू शकतो, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना आणखी काही महिने खड्ड्यांमधूनच वाट काढावी लागणार आहे. 

पिलखोड(ता. चाळीसगाव) : चाळीसगाव-मालेगाव रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 'हायब्रीड ऍन्युइटी' योजना मंजूर झाली आहे. त्याची निविदा देखील निघाली आहे. मात्र, त्या प्रक्रियेला सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने आणखी काही महिने वाहनधारकांना खड्ड्यामय रस्त्यातून वाट काढावी लागणार आहे. 

चाळीसगाव-मालेगाव या राज्य महामार्गाच्या (क्र. 19) खड्ड्यांची आपभीती अजुनही कायम आहे. तात्पुरती डागडुजीखेरीज रस्त्याच्या नूतनीकरणास वारंवार विलंब होत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. यामुळे हा रस्ता प्रवाशांच्या शारीरिक व्याधींचे मुळ  ठरु लागला आहे. या 49 किलोमीटरच्या नूतनीकरणासाठी ' 'हायब्रीड ऍन्युइटी'  योजना मंजूर झाली आहे. मात्र, ती प्रक्रिया लांबत चालल्याने कधी पुर्णत्वास जाईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागुन आहे.

शारीरिक व्याधींचे मूळ....
खड्ड्यामय रस्त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे वाहनचालक व प्रवाशांच्या शारीरिक व्यांधींमध्ये वाढ झाली आहे. पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. तर काही गरोदर माता व वृद्ध व्यक्तींसाठी हा रस्ता पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतो. रात्री-अपरात्री हा रस्ता वाहनांसाठी घातक आहे. रस्त्यावरील ठिकठिकाणच्या खड्ड्यांमुळे छोट्यामोठ्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. 

वाहनांच्या 'मेंटेनन्स'मध्ये वाढ...
दुचाकीसह मोठ्या वाहनांच्या मेंटेनन्समध्ये वाढ झाली आहे. दर महिन्यात वाहनावर करावा लागणार्या खर्चामुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. खराब रस्त्यामुळे या रस्त्यावरची रहदारी देखील काही अंशी कमी झाली आहे. 

डागडुजीने आजचे मरण उद्यावर...
फाटलेल्या गोधळीला शिवावे असे या रस्त्याची डागडुजी चाळीसगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केली जात आहे. नुकतीच पिलखोडलगत डागडुजी करण्यात आली. मात्र, डागडुजी फार काळ तग धरत नसल्याने पुन्हा 'जैसे थे'  होत आहे. चाळीसगावकडे जाताना पिलखोड ते टाकळी प्र.दे. आणि टाकळी प्र.दे. ते आडगाव तर मालेगावकडे जाताना नरडाणाफाट्यापर्यंत रस्ता निकामी झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजु खराब असल्याने वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. बांधकाम विभागाकडून होत असलेल्या तात्पुरत्या डागडुजीने आजचे मरण उद्यावर ढकलले जात आहे.

नूतनीकरणास आणखी लागणार काही महिने!
चाळीसगाव- मालेगाव रस्त्याचे 'हायब्रीड ऍन्युइटी' योजनेचे काम नाशिक बांधकाम विभागाकडे आहे. रस्त्याची निविदा ही निविदा प्रक्रिया मुख्यालयातून मंत्रालयाच्या एका समितीकडे पाठविण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण व्हायला सुमारे सहा महिन्यांचा काळ लागू शकतो, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना आणखी काही महिने खड्ड्यांमधूनच वाट काढावी लागणार आहे. 

Web Title: bad condition on chalisgaon malegaon road