अण्णा हजारेंच्या आंदोलनास बागलाण भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचा पाठींबा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानात सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास बागलाण तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनकडून पाठींबा देण्यात आला आहे.

सटाणा - शासनाने सक्षम लोकपालाची नियुक्ती करून जनलोकपाल कायदा करावा व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे रामलीला मैदानात सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास बागलाण तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनकडून पाठींबा देण्यात आला आहे. शासनाने त्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनआंदोलनतर्फे  निवेदनाद्वारे देण्यात आला.

बागलाण तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण व सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. टी. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात, लोकपाल व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी छेडलेल्या सत्याग्रह आंदोलनात देशभरातील जनता व शेतकरी एकजुटीने सहभागी झाले आहेत. सरकार देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. गेल्या चार वर्षांत अण्णांनी विविध प्रश्नांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना 43 पत्रे लिहिली. मात्र साधी पोचही त्यांना मिळालेली नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी शासनाने केंद्रामध्ये लोकपालची स्थापना करावी. राज्यांमध्ये लोकायुक्त यांची स्थापना करावी पण त्यांच्या बदलीचे अधिकार सरकारला नसावेत, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी अण्णांनी सुरु केलेल्या आंदोलनास बागलाण तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनतर्फे पाठींबा असून शासनाने सर्व मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संजय ह्याळीज, उपाध्यक्ष लक्ष्मण सोनवणे, सचिव शाम बगडाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तालुका उपाध्यक्ष पंडितराव अहिरे, शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, किशोर ह्याळीज, भाऊसाहेब देसले, नाना मोरकर, नगरसेवक बाळासाहेब बागुल, राजू जगताप, विक्रम पाटील, दादाजी आहेर, केशव सोनवणे, पंकज जगताप, योगेश गांगुर्डे, बापूसाहेब भामरे, पुष्पराज धाबळे, रमेश भामरे, राकेश खैरनार आदींसह नागरिक उपस्थित होते.  

Web Title: Baglan anti-corruption movement supported Anna Hazare