जळगावमध्ये फेब्रुवारीत बहिणाबाई महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

जळगाव : महिला बचत गटांना आर्थिक बळ देणारा व सांस्कृतिक चळवळ अधिक दृढ करणारा बहिणाबाई महोत्सव 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे समन्वयक दीपक परदेशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : महिला बचत गटांना आर्थिक बळ देणारा व सांस्कृतिक चळवळ अधिक दृढ करणारा बहिणाबाई महोत्सव 11 फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे समन्वयक दीपक परदेशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नगरसेविका सीमा भोळे, लक्ष्मी ऍग्रोचे बाळासाहेब सूर्यवंशी, कलावंत विनोद ढगे, गोपाळ कापडणे, मुग्धा कुलकर्णी, चाणक्‍य जोशी, नेहा बोरसे, अमय जोशी, रोशन गांधी यावेळी उपस्थित होते. येथील सागर पार्क मैदानावर 11 ते 15 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या महोत्सवाचे उद्‌घाटन सिनेअभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते होईल. 11 फेब्रुवारीस सायंकाळी पाचला उद्‌घाटन होईल. तत्पूर्वी शहरातून विविध शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला मंडळांचे लेझीम पथक, ढोलपथक, विविध वाद्यांची रॅली काढण्यात येईल.

220 बचत गटांचा सहभाग
महोत्सवात जळगावसह राज्यातील 220 बचत गटांनी सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा एकमेव उद्देश महोत्सवाचा आहे.

खाद्यमहोत्सवही
महोत्सवात बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. यात भरीत, भाकरी, शेवभाजीसह खानदेशातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद जळगावकरांना घेता येणार आहे.

बहिणाबाई पुरस्कार
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींना बहिणाबाई पुरस्कार देण्यात येणार आहे. सोबत महिलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्था, महिला मंडळांना बहिणाबाई स्त्रीशक्ती सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.

विविध स्पर्धा
महोत्सवानिमित्त 28 जानेवारीस सागर पार्कवर भव्य रांगोळी स्पर्धा होईल. आतापर्यंत 110 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. रंगभरण स्पर्धा 5 फेब्रुवारीला बहिणाबाई उद्यानात होईल.

भारुडकार तिवारी, शाहीर पाटील यांचा कार्यक्रम
खानदेशातील लोककला व लोककलावंतांचे जतन व्हावे, या उद्देशाने विविध लोककला, शाहिरी, भारूड, लग्नगीते, वही गायन कार्यक्रम होईल. एक हजार शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंत आपली कला यावेळी सादर करतील. "मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमातील विजेते शाहीर देवानंद माळी यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम, खानदेशातील शाहीर शिवाजी पाटील (नगरदेवळा), भारूडकार चंदाताई तिवारी यांचा कार्यक्रमही सादर होईल.

Web Title: bahinabai fest in jalgaon