पाकमध्ये केळीनिर्यात पुन्हा सुरू

दिलीप वैद्य
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पाकिस्तान आणि काश्‍मीरमधील परिस्थिती अनुकूल राहिल्यास केळी निर्यात मे महिन्यापर्यंत सुरू राहील. पाकिस्तानमधून प्रतिसाद चांगला असल्यास ही निर्यात आणखी वाढू शकेल.

- भरत सुपे, संचालक, चक्रधर फ्रूट कंपनी, वाघोदा, ता. रावेर

आठवड्याला 200 ट्रक निर्यात
रावेर (जि. जळगाव) - काश्‍मीरमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी उसळलेल्या दंगलीनंतर पाकिस्तानमध्ये बंद झालेली केळी निर्यात या आठवड्यात पुन्हा सुरू झाली. एका आठवड्यात सुमारे 200 ट्रक असे या निर्यातीचे प्रमाण असून, यामुळे शेतकऱ्यांच्या दर्जेदार केळीला अडीचशेपर्यंत वाढीव भाव मिळत आहे.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी काश्‍मीरमध्ये बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. तसेच दहशतवादी कारवाया, भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. यामुळे केळी निर्यातही पूर्णपणे थांबविण्यात आली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या थंडीमुळे पाकिस्तानमध्ये भारतीय केळीची मागणी वाढली आहे. तसेच सीमावर्ती भागातही तुलनेने शांतता असल्याने त्या भागातून केळी व अन्य मालाची आयात-निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. केळीची निर्यात मागील आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली होती. आता ही निर्यात सुरळीत झाल्याची माहिती व्यापारी बांधवांनी "सकाळ'ला दिली. सध्या जम्मू व श्रीनगर मार्गे रोज सुमारे 50 ट्रक केळी पाठविली जात आहे.

Web Title: banana export to pakistan