पोलिस ठाण्यात गुन्हेगारांचे स्वागत बंद करा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

पोलिस ठाण्यात गुन्हेगारांचे स्वागत बंद करा 

पोलिस ठाण्यात गुन्हेगारांचे स्वागत बंद करा 

नंदुरबार,ः खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांतील संशयित गुन्हेगारी मोडून काढावी, यासाठी पोलिस प्रशासनाने कडक धोरण स्वीकारावे. गुन्हेगारांचे आवभगत न करता त्यांना पोलिसांची भीती वाटेल अशी प्रतिमा निर्माण करावी, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केली. 
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्यांचा कायदा- सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यासाठी काल (ता. 2) रात्री अकराला बैठक झाली. तीत श्री. केसरकर बोलत होते. आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील (नंदुरबार), एम. रामकुमार (धुळे), दत्तात्रय कराळे (जळगाव), नंदुरबारचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुंडे उपस्थित होते. 
श्री. केसरकर म्हणाले, की सर्वसामान्य जनता पोलिसांना आपला मित्र समजेल अशी पोलिसांची प्रतिमा निर्माण करावी. राज्यासह खानदेशातील गुन्हेगारीचा बीमोड करण्याची गरज आहे. पोलिस काही वेळा खूप चांगले काम करतात. छापे टाकतात, जिवावर उदार होऊन कायदा- सुव्यवस्थेची अंमलबजावणी करतात; परंतु पोलिसांप्रती जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी पोलिस विभागाला कामाचा दर्जा सुधारावा लागेल. तिन्ही पोलिस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेची सविस्तर माहिती दिली. संजय पाटील यांनी संयोजन केले. सायंकाळी पाचला होणारी बैठक मंत्री केसरकर यांच्या राईनपाडा (ता. साक्री) येथील भेटीमुळे रात्री अकराला सुरू होऊन मध्यरात्री एकला संपली. 

Web Title: band