बॅंक ग्राहकांवर पाळत ठेवणारे तीन परप्रांतीय ताब्यात

Crime
Crime

जळगाव - शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने आणि बॅंकांच्या बाहेर पाळत ठेवून बॅगसह रोकड लंपास करणाऱ्या परप्रांतीय टोळीतील तिघांना डीबी पथकाने संशयित हालचालींवरून ताब्यात घेतले आहे. आज दुपारी शाहूनगरातील आयसीआयसीआय बॅंक, नंतर रिंग रोडवरील स्टेट बॅंकेच्या शाखेजवळ सापळा लावून उभ्या असलेल्या परप्रांतीय तिघांना शहर व जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. यात पोलिसांची गाडी पाहताच एक भामटा फरार होण्यात यशस्वी ठरला. 

व्यापारी प्रतिष्ठाने, हवाला ट्रेडर्स आणि बॅंकांच्या परिसरात टेहाळणी करीत बॅंकेतून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना पैसे पडल्याची बतावणी करून त्यांची बॅग किंवा रक्कम लांबविण्यात बिटरगुंटा आणि इराणी गॅंगचा हातखंडा आहे. जिल्ह्यात यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आज दुपारी बाराच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील नवजित चौधरी यांना तिघे दिसले. संशय आल्याने अगोदर त्यांचे हावभाव आणि हालचाली टिपत मदतीला सहकारी प्रीतम पाटील, सुनील पाटील, नाना तायडे, प्रशांत जाधव, हेमंत तायडे, रवी नरवाडे, राजू मेंढे यांना बोलावून घेतले.

वेगवेगळ्या गटांत या पथकाने संशयितांच्या हालचाली टिपल्यावर रिंगरोडवरील स्टेट बॅंक शाखेजवळ तिघांवर झडप घातली. ताब्यात घेतलेले तिघेही बॅंकेबाहेर उभ्या वाहनांची टेहाळणी करीत होते. बॅंकेतून निघणारे ग्राहक, वयोवृद्ध आणि व्यापाऱ्यांवर तिघेही पाळत ठेवून मोठी रक्कम पळविण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यापैकी एक भामटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. लक्ष्मण येळंब्बा मेळकुट्टी, दुर्गा दुर्गाप्पा वरगंटी (दोघे रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि परशुराम दुर्गाप्पा वरगंटी (रा. निवारंगी, जि. सोलापूर) अशी तिघांची नावे असून, ताब्यात घेतल्यावर सोलापूरचा पत्ता सांगणारे हे तिघेही मूळ आंध्र प्रदेशातील बिटरंगुटा गावातील असून, जळगाव शहरात अजिंठा हाउसिंग सोसायटी, तळेले कॉलनी, जुने जळगाव परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. चौथा सहकारी पाचोरा येथे गेल्याची माहिती तिघांनी दिली आहे.

परप्रांतीय भामटे नजरेआड
जिल्हा पोलिस दलातर्फे गुन्हा घडल्यावर आणि गुन्हा घडण्याअगोदर स्थानिक रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी केली. जाते, मात्र बाहेरील राज्यातून येणाऱ्या अशा टोळक्‍यांना तपासण्याची तसदी स्थानिक पोलिस ठाणे घेत नाही. कुठल्या राज्यातील कोण कुठे वास्तव्यास आहे. किंवा विविध राज्यांतून व्यवसायानिमित्त येणारे भामटे दिवसा व्यापाराच्या बहाण्याने टेहाळणी व रात्री घरफोड्या आणि बॅग लिफ्टिंगचे गुन्हे करीत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे, तरी परप्रांतीय येणाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com