
Nandurbar Accident News : बँकेचा वसुली अधिकारी अपघातात ठार
Nandurbar News : भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात नंदुरबार मर्चंट बँकेचे वसुली अधिकारी विपीन मांगीलाल तांबोळी (वय ५२, रा. शाहूनगर, नंदुरबार) ठार झाले. हा अपघात १६ मेस दुपारी सव्वाचारला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दहिवद (ता. शिरपूर) जवळ बायपासवर घडला. (Bank recovery officer killed in an accident jalgaon news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंधव्याकडून शिरपूरला येत असताना दहिवद गावाच्या बायपास रस्त्यावर तांबोळी यांचे कार (जीजे ०५, जेएफ २८६९) वरील नियंत्रण सुटले. भरधाव कार अनियंत्रित होऊन उलटली. त्यात कारचा चक्काचूर झाला.
मोठा आवाज झाल्याने दहिवद येथील ग्रामस्थांनी गर्दी केली. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या चालकाला बाहेर काढले. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ओळखपत्रावर उलगडा
मृत चालकाच्या खिशात नंदुरबार मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे ओळखपत्र आढळले. त्यावर विपीन मांगीलाल तांबोळी असे नाव असून, नंदुरबार येथील तूप बाजारातील कार्यालयाचा पत्ता दिलेला होता. त्यावरून संपर्क साधून संबंधितांना माहिती देण्यात आली.
तांबोळी सेंधवा येथे कशासाठी गेले होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. सांगवी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार संजय माळी तपास करीत आहेत.