ऐन दिवाळीत एटीएममध्ये खडखडाट; आता काय करायचं ग्राहकापुढे प्रश्न!

Satana-ATM
Satana-ATM

सटाणा : ऐन दिवाळीत सटाणा शहरातील जवळपास सर्वच बँकांच्या ‘एटीएम’ मध्ये खडखडाट आहे. बहुतांश एटीएमबाहेर ‘नो कॅश’ चा फलक लावण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. दिवाळी असल्याने बँकांनी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, बँकांच्या दुर्लक्षाचा फटका दिवाळीची खरेदी करणार्‍या ग्राहकांना बसत आहे. 

दिवाळीला दोन दिवसांपासून सुरवात झाली आहे. मात्र दिवाळीनिमित्त यंदा सलग चार दिवस बँका बंद आहेत. शुक्रवारी (ता.25) धनत्रयोदशी, शनिवारी (ता.26) चौथा आठवडा, रविवारी (ता.27) रोजी साप्ताहिक आणि उद्या सोमवारी (ता.28) रोजी ‘दिवाळी पाडवा’ असल्याने बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे सलग चार दिवस बँका बंद असल्याने ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली असून बाजारपेठेत रोकडची चणचण जाणवत आहे. ऐन सणासुदीच्या कालावधीत शहरातील बँकांनीही नियोजन करणे गरजेचे असताना बँकांकडून मात्र असे झालेले दिसत नाही. दिवाळी सणानिमित्त शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याने बहुतांश नागरिक कॅशसाठी एटीएमवरच अवलंबून आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून बँका बंद असताना दिवाळीच्या खरेदीमुळे सर्व एटीएममधील शिल्लक रोकड संपल्याने सुट्टीच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता.25) एटीएममध्ये चलन तुटवडा दिसून आला. पुढील दोन दिवस रविवारी व सोमवारी बँकांना सुट्टी असल्याने पुन्हा अडचण जाणवणार आहे. शहरातील सर्व बँकांचे एटीएम मशिन रोकड अभावी बंद आहेत. 

शुक्रवारी धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात झाल्याने खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली. त्या व्यवहारांचा भार एटीएम केंद्रांवर पडला. शहरातील प्रमुख बँकांच्या एटीएम केंद्रांमध्ये पैसेच शिल्लक नसल्याचे चित्र होते. त्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांनी आपला मोर्चा इतर एटीएम केंद्रांवर वळविला. त्यामुळे त्या केंद्रांवरही पैशांचा खडखडाट निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागले. लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे बँकांनी एटीएममध्ये आगाऊ स्वरुपात रोख भरून ठेवली होती. मात्र, सणानिमित्त खरेदीच्या व्यवहारासाठी एटीएम केंद्रांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने समस्या निर्माण झाली. 

आता जवळपास सर्वच बँकांनी ऑनलाइन व्यवहारांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अजूनही मोठा वर्ग एटीएम, मोबाइल अॅप आणि ऑनलाइन व्यवहारापासून लांबच असल्याने ते रोखीतच व्यवहार करण्यास पसंती देतात. त्यामुळे ग्राहकांना रोख रकमेची चणचण भासत असून त्याचा बाजारपेठेवरही थेट परिणाम होत आहे. शहरातील एकमेव आयसीआयसीआय बँकेचे एटीएम रविवारी दुपारपर्यंत सुरू असल्याने या एटीएमवर नागरिकांच्या मोठ्या रांगा होत्या. परंतु, दुपारी तीन वाजेनंतर त्यातील रोकडही संपल्याने ग्राहकांसमोर मोठा पेचप्रसंग उभा आहे. ऐन सणासुदीच्या काळात शहरातील सर्व बँकांनी एटीएम मशीन सुरू राहतील याची काळजी घ्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

संबंधित बँकांची जबाबदारी

एटीएम केंद्रांमध्ये रक्कम जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या नजीक असणार्‍या बँकांच्या शाखेची असते. तसेच बाहेरील कंपन्यांकडून (आऊटसोर्स) देखील हे काम केले जाते. लागोपाठ येणार्‍या सुट्ट्यांच्या वेळी एटीएम केंद्रे तात्काळ रिकामी होतात. अशावेळी खबरदारी म्हणून आगाऊ स्वरुपात एटीएम केंद्रांवर रोखेचा भरणा करुन ठेवला जातो. प्रत्येक एटीएममध्ये पैसे टाकण्याची मर्यादा निश्चित असल्याने त्यांनाही तेवढेच पैसे त्यामध्ये भरता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com