बॅंकांबाहेरची गर्दी ५० दिवसांनंतरही कायम!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

साक्री शहरातील चित्र; अनेक बॅंकांचे ‘एटीएम’ बंदच; सामान्य ग्राहकांचे हाल

साक्री - चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय होऊन ५० दिवस होत आले तरी, बॅंकांबाहेरील सर्वसामान्य ग्राहकांची गर्दी कायम आहे. आपले पैसे काढण्यासाठी तसेच जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी अजूनही ग्राहकांना रांगा लावाव्या लागत आहेत.

साक्री शहरातील चित्र; अनेक बॅंकांचे ‘एटीएम’ बंदच; सामान्य ग्राहकांचे हाल

साक्री - चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय होऊन ५० दिवस होत आले तरी, बॅंकांबाहेरील सर्वसामान्य ग्राहकांची गर्दी कायम आहे. आपले पैसे काढण्यासाठी तसेच जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी अजूनही ग्राहकांना रांगा लावाव्या लागत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ नोव्हेंबरला पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढचे ५० दिवस म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच या निर्णयानंतर उद्‌भवणारी परिस्थिती सावरण्यासाठीही पुढचे ५० दिवस मला द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. मात्र, आता ही मुदत संपत आली असतानाही सर्वच ठिकाणी बॅंकांबाहेरील गर्दी कमी होण्याची चिन्हे नाहीत. अजूनही बॅंकेतून आपले पैसे काढण्यासाठी ग्राहक रांगेत उभे राहत आहेत. या निर्णयाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून, बाजारात अद्यापही पुरेसे चलन उपलब्ध न होऊ शकल्याने व्यवहार सुरळीत होऊ शकलेले नाहीत. तसेच शेतकरीही या निर्णयामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.

शेतात पिकविलेला माल विकला जात नसून, विकला तरी कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
 

‘एटीएम’चे शटर डाउनच
साक्री शहरात बॅंकांमध्ये अद्यापही गर्दी कायम असताना, पुरेशा चलनाअभावी ‘एटीएम’चे शटरही अद्याप उघडलेले नाहीत. शहरातील स्टेट बॅंकेचे एटीएम वगळता उर्वरित सर्व एटीएम मशिन गेल्या ५० दिवसांपासून बंदच आहेत. हे मशिन बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, बॅंकेत रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नसल्याने नोटा बंदीचा निर्णय चांगला असला तरी मात्र त्याची झळही सोसावी लागत आहे. सुरू असलेल्या ‘एटीएम’मधून अद्यापही केवळ दोन हजार रुपयांचीच नवी नोट मिळत असल्याने त्याचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही. या सर्व परिस्थितीमुळे ‘अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Web Title: Banks continued to outdoor crowd 50 days!