बॅंकांबाहेरच्या रांगा झाल्या कमी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

जळगाव - गेल्या पंधरा दिवसांपासून पाचशे व हजाराच्या चलनी नोटा बाद करण्यात आल्याने शंभर रुपयांच्या नोटेसह सुट्या पैशांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बाद नोटा बदलविण्यासाठी बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहावयास मिळत होत्या. आज मात्र बॅंकांबाहेरील या रांगा कमी झाल्याचे चित्र शहरातील बॅंकांबाहेर पाहावयास मिळाले.

जळगाव - गेल्या पंधरा दिवसांपासून पाचशे व हजाराच्या चलनी नोटा बाद करण्यात आल्याने शंभर रुपयांच्या नोटेसह सुट्या पैशांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बाद नोटा बदलविण्यासाठी बॅंकांबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहावयास मिळत होत्या. आज मात्र बॅंकांबाहेरील या रांगा कमी झाल्याचे चित्र शहरातील बॅंकांबाहेर पाहावयास मिळाले.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून चलनात असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. तेव्हापासून नागरिक नोटा बदलविण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी करत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून बॅंकांमध्ये नोटा बदलविण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, एका व्यक्‍तीला दोन-अडीच तास रांगेत उभे राहावे लागत होते. यानंतर बॅंकेतून पाचशे व हजाराच्या नोटा बदलवून मिळत होत्या. यामुळेही नागरिक त्रस्त झाले होते. हीच परिस्थिती ‘एटीएम’बाहेर पैसे काढणाऱ्यांची होती. हे सारे चित्र शहरातील सर्वच प्रमुख बॅंक व ‘एटीएम’च्या बाहेर पाहावयास मिळत होते.

दुपारनंतर झाली गर्दी कमी
काल रविवारच्या सुटीमुळे बॅंकांचा कारभार बंद होता. त्यानंतर आज सकाळी दहाला बॅंकांचे कामकाज सुरू झाले. यावेळी नोटा बदलविणारे आणि खात्यात रक्‍कम भरणा करणारे यांच्या रांगा स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय, ॲक्‍सिस बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र यांसह अन्य बॅंकांसमोर लागलेल्या होत्या. परंतु, दुपारनंतर ही गर्दी कमी झाल्याचे चित्र होते. नोटा बदलविण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यात येत असल्याने वारंवार नोटा बदलविणाऱ्यांना आळा बसल्याने आज गर्दी कमी झाल्याचे पाहावसाय मिळाले. रांगेत उभे राहिल्यानंतर एका व्यक्‍तीस ३० ते ४५ मिनिटे वेळ लागत होता. रक्‍कम डिपॉझिट करणाऱ्यांपेक्षा नोटा बदलविणाऱ्यांची संख्या आज जास्त होती.

‘एटीएम’बाहेर लांब रांगा
शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाची मुख्य शाखा, नवीपेठेतील ॲक्‍सिस बॅंक, एचडीएफसी, युनियन बॅंक यांचे ‘एटीएम’ सुरू होते. काल रविवार असल्याने बहुतांश ‘एटीएम’ बंद असल्याने नागरिकांना पैसे काढण्यासाठी सुरू असलेल्या ‘एटीएम’चा शोध घ्यावा लागला. मात्र, आज ‘एटीएम’ मशिन सुरू असल्याने सर्वच ठिकाणी पैसे काढणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. 

कपिल गुजर ः माझ्या खात्यावर वडिलांनी टाकलेले पैसे काढता येत नाही. शिक्षणासाठी येथे असून, रूमवर राहत नसल्याने नाश्‍ता करायला, किरकोळ वस्तू घ्यायला पैसे नाहीत. शिवाय खानावळचे पैसे द्यायलाही अडचण येत आहे. ‘एटीएम’वरही गर्दी असल्याने पैशांअभावी हाल होत आहेत.

गणेश भावसार ः पाचशे व हजाराच्या चलनी नोटा बाद झाल्यापासून पैशांची अडचण निर्माण झाली आहे. नोटा बदलून घेतल्या, तरीही पैशांचा प्रश्‍न निर्माण होत आहे. पैसे काढण्यासाठी वारंवार ‘एटीएम’च्या बाहेर रांगेत उभे राहावे लागते.

Web Title: Banks were out of the rows