बाप्पाच्या स्वागतासाठी जळगावनगरी सजली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

आजपासून दहा दिवस उत्साह; पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी 

जळगाव - लाडक्‍या बाप्पाच्या आगमनाची अनेक दिवसांपासून असलेली प्रतीक्षा संपली असून, गणेशोत्सवाला उद्यापासून (ता. ५) सुरवात होत आहे. लाडक्‍या बाप्पाच्या स्वागताची गणेशभक्‍तांकडून सुरू असलेली तयारी संपली असून, दहा दिवसांच्या उत्साहासाठी जळगावनगरी सजली आहे. यामुळेच गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत आज गर्दी उसळली होती. फुले, प्रसाद, गणेशमूर्ती, गुलाल, आरास खरेदी करतानाचे चित्र बाजारपेठेत पाहण्यास मिळाले.

आजपासून दहा दिवस उत्साह; पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी 

जळगाव - लाडक्‍या बाप्पाच्या आगमनाची अनेक दिवसांपासून असलेली प्रतीक्षा संपली असून, गणेशोत्सवाला उद्यापासून (ता. ५) सुरवात होत आहे. लाडक्‍या बाप्पाच्या स्वागताची गणेशभक्‍तांकडून सुरू असलेली तयारी संपली असून, दहा दिवसांच्या उत्साहासाठी जळगावनगरी सजली आहे. यामुळेच गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत आज गर्दी उसळली होती. फुले, प्रसाद, गणेशमूर्ती, गुलाल, आरास खरेदी करतानाचे चित्र बाजारपेठेत पाहण्यास मिळाले.

आराध्य दैवत लाडक्‍या बाप्पाचे उद्या (ता.५) श्री गणेश चतुर्थीला आगमन होत आहे. शहरातील मुख्य परिसर असलेल्या नेहरू चौक, सुभाष चौक, नवी पेठ, पोलन पेठ, रथ चौक परिसरात गणेश मंडळांनी भव्य आरास उभारणीचे काम सुरू आहे. श्री गणरायाचे उद्या भक्तीभावात आगमन होणार असून श्रीगणेश मंडळासह घरोघरी गणपती बाप्पा बसत असल्याने लहान मुलांपासून तर मोठ्यांनी आज दुपारपासून गणपतीची मूर्ती व सजावटीसाठीचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी केलेली दिसत होती. उद्यापासून सलग दहा दिवस या उत्सवाचा उत्साह, जल्लोष राहणार आहे. 

सजावट, पूजासाहित्याने दुकाने थाटली

गणेशोत्सवानिमित्त शहरातील फुले मार्केट परिसर, अजिंठा चौफुली, रिंग रोड तसेच गणेश कॉलनी परिसरात विविध वस्तूंची दुकाने लावण्यात आली आहेत. बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी दुकाने फुललेली आहेत. यात मोत्याचे हार, मखर, पताका, चमकी पट्टी- बॉल, लायटिंग, मुकुट आदी साहित्य आहे. तसेच पूजेसाठी दूर्वा, केळीचे खांब, फळ, आंब्याची पाने देखील विक्रीसाठी उपलब्ध होती. उद्या गणेश चतुर्थीला येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अनेकांनी आजच खरेदी करून घेतली.

मूर्ती घेऊन जाण्यासाठी धावपळ 

शहरातील टॉवर चौक, अजिंठा चौफुली तसेच बहिणाबाई चौकातील रिंगरोडवर गणेश मूर्ती विक्रीच्या मोठ्या प्रमाणात स्टॉल लागले आहे. बाप्पाची आकर्षक मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांचा ओढा असून, त्या अनुषंगाने विविध रूपातील मूर्ती घेण्यासाठी नागरिक मूर्ती विक्रेत्यांकडे बुक करत आहेत. तसेच मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांकडे बुकिंग केलेली गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यां धावपळ दिसून येत होती.

बाप्पाची विविध रूपे  

मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलवर बाप्पाचे विविध रुपातली सुबक मूर्ती पाहण्यास मिळाले. त्यात बाहुबलीच्या रुपातील मूर्ती, बाल गणेश अशा मूर्ती लहान मुलांना भावत आहे. तसेच शाडू मातीच्या मूर्त्यांना देखील नागरिकांकडून मागणी होत आहे. शाडू मातीच्या लहान मूर्ती दोनशे रूपयांपासून उपलब्ध होत्या. तर, पीओपीच्या लहान गणेश मूर्ती शंभर रूपयांपासून हजार रूपयांपर्यंत विक्रीस होत्या.

दिवसभर शुभमुहूर्त

बाप्पाचे उद्या (ता.५) ढोल- ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत होणार आहे. बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहे. यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी मुहूर्त असल्याचे द्वारकाधीश जोशी यांनी सांगितले.

Web Title: Bappa Jalgaon city to welcome the sajali