देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक व्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नाशिक -  चलनातून हजार व पाचशेच्या नोटा रद्द करून आठ दिवस झाल्यानंतरही लोकांच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे विरोधी पक्षांसह मित्र पक्षांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता ही अडचण सहन करणे म्हणजे राष्ट्रकार्य असल्याचे लोकांवर बिंबविण्यास सुरवात केली आहे. यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जशा "आधी रोटी खाएंगे, स्वाधीनता दिलाएंगे' अशा घोषणा दिल्या जात होत्या.

नाशिक -  चलनातून हजार व पाचशेच्या नोटा रद्द करून आठ दिवस झाल्यानंतरही लोकांच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे विरोधी पक्षांसह मित्र पक्षांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता ही अडचण सहन करणे म्हणजे राष्ट्रकार्य असल्याचे लोकांवर बिंबविण्यास सुरवात केली आहे. यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जशा "आधी रोटी खाएंगे, स्वाधीनता दिलाएंगे' अशा घोषणा दिल्या जात होत्या. तशाच पद्धतीने पन्नास दिवस थोडासा त्रास सहन करून देशाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अर्थक्रांतीमधील अर्थक्रांतिकारक व्हा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिन्नरकरांना आवाहन केले.

सिन्नर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून देण्यासाठी आवाहन करतानाच नोटा रद्दमुळे निर्माण झालेल्या अडचणी सहन करण्याचेही आवाहन केले. सिन्नर पालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना, असा प्रमुख सामना असताना संपूर्ण भाषणात त्यांनी शिवसेनेवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षही टीका केली नाही. सिन्नर पालिकेत शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच श्री. कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन वातारवणनिर्मिती केली. या सभेला सिन्नरकरांनीही चांगली गर्दी केली होती. सभेच्या सुरवातीला सिन्नर शहरातील व जिल्ह्यातील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरांच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देतानाच स्वच्छ भारत अभियान, मुद्रा योजना, पंतप्रधान आवास योजना, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, स्कील इंडिया आदी योजनांची माहिती दिली.

त्यांनी पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबरला हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या निर्णयामुळे दहशतवाद, नक्षलवाद यांना मदत करणाऱ्या शत्रूंना मोठा धक्का बसला आहे. भारताच्या बनावट नोटा छापणारा पाकिस्तान परास्त झाला आहे, तसेच अधिकाधिक कर जमा होऊन शेतकरी, शेतमजूर, गरीब यांच्या कल्याणाच्या योजना आखण्यासाठी सरकारकडे कररूपाने अधिकाधिक पैसे येणार असल्याचा दावा केला. या निर्णयाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी थोडीची अडचण सहन करून मोदी यांना 50 दिवस सहकार्य करण्याचे आवाहन केले. या वेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सुरेशबाबा पाटील, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, वसंत गिते, सुनील बागूल, लक्ष्मण सावजी, सुनील केकाण, सिन्नरचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कोऱ्या लेटरहेडवर सह्या करून देतो
माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रास्ताविकात सिन्नरच्या विकासासाठी भुयारी गटार योजना, कडवामधून थेट पाणीपुरवठा योजनेला वाढीव निधी, सिन्नर पालिकेच्या पवन ऊर्जा प्रकल्पाला तांत्रिक मान्यता, तसेच देव नदीवर वळणयोजना राबविण्यासाठी मान्यता देणे ही कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे आवाहन केले. याचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की माणिकराव तुमच्यासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या करून देतो. तुम्हाला ते पाहिजे ते घेऊन जा. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणातून माणिकराव कोकाटे यांचे तोंडभरून कौतुक केले. माणिकराव यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. सरकारने दिलेल्या निधीमुळे नाही, तर अशा दूरदृष्टीच्या नेत्यांमुळे शहरे बदलतात. माणिकराव यांनी मागणी केलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याची मी हमी देतो. यासाठी तुम्ही श्री. कोकाटे यांच्या ताब्यात पालिका द्या, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

Web Title: Be the revolutionary economic independence of the country