बेदम मारहाण करून प्रौढाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

दोन संशयित ताब्यात
घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मृताच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यावर पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर मारहाण करणाऱ्यांमधील नीलेश बाविस्कर आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

जळगाव - शहरातील बी. जे. मार्केटसमोरील अप्पा महाराज समाधीजवळ इलेक्‍ट्रिकचे दुकान चालविणाऱ्या वासुदेव त्र्यंबक डांगे (वय ५३, हनुमाननगर) यांना किरकोळ कारणावरून चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली. 

जखमी अवस्थेत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोचल्यावर तेथून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रक्ताची उलटी होऊन रुग्णालयातच डांगे यांचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना जखमीने चौघांची नावे सांगितल्याने या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

औद्योगिक वसाहत परिसरातील हनुमाननगर परिसरात वासुदेव त्र्यंबक डांगे (वय ५३,) पत्नी कल्पना, मुलगा कृष्णा, मुलगी रूपाली यांच्यासह वास्तव्यास आहेत. वासुदेव यांचे शहरातील अप्पा महाराज समाधीजवळ साई इलेक्‍ट्रिकल्स म्हणून दुकान असून, आज सायंकाळी सातच्या सुमारास काहीतरी किरकोळ कारणावरून राजू न्हावी, नीलेश बाविस्कर, गोळावाला आणि अन्य एक अशा चौघांनी डांगे यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. समाधीजवळ ट्रॅकऑन कुरियर समोरून मारहाण करीत त्यांना चौकापर्यंत आणि नंतर बी. जे. मार्केटमध्ये आत नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. मारहाणीत नाकाला, तोंडाला आणि छातीत जबर दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत वासुदेव डांगे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले.

ठाणे अंमलदाराला मारहाणीची माहिती दिल्यावर त्यांनी तत्काळ जखमीला लेखी मेमो देऊन जिल्हा रुग्णालयात रवाना केले. डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचाराला सुरवात केल्यावर काही वेळाने वासुदेव डांगे यांना रक्ताची उलटी होऊन प्रकृती खालावत जाऊन टेबलावरच त्यांचा मृत्यू ओढवला. 

वासुदेव डांगे यांना मारहाण होत असल्याचे खंडू बारी यांनी फोन करून महिला पोलिस रूपाली (वासुदेव यांची मुलगी) यांना कळविले. त्यानंतर कुटुंबीयांनी जिल्हापेठ पोलिसांत धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण घटनाक्रम वासुदेव यांनी ठाणे अंमलदार यांना सांगितला होता. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर वासुदेव यांनी मुलगी रुपालीस मारहाण करणाऱ्यांची नावे सांगून कशा पद्धतीने मारहाण झाली हे देखील सांगितले. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर रुपालीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप अराक करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating Murder Crime