महिला वाहकासह प्रवासी दाम्पत्यास मारहाण

एरंडोल - बस आगारात मारहाणीचा निषेध करताना कर्मचारी.
एरंडोल - बस आगारात मारहाणीचा निषेध करताना कर्मचारी.

एरंडोल - महिला वाहक, व बसमधील प्रवासी दाम्पत्यास मारहाण करण्यात आली. ही घटना आज आडगाव (ता. एरंडोल) येथे सकाळी दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एरंडोल आगारात कर्मचाऱ्यांतर्फे निषेध करण्यात आला. 

आज सकाळी पावणेआठला निघणाऱ्या एरंडोल- भडगाव बसवर महिला वाहक सुवर्णा अनिल सोनवणे (मालचे) व चालक मुशिरोद्दीन जैदोद्दीन शेख यांची नियुक्‍ती होती. बस (एमएच२०बीएल१४२९) भडगावकडून एरंडोलकडे येत असताना आडगाव येथे थांबा असल्याने प्रवाशांसाठी बस थांबली. बसमध्ये प्रवासी चढल्यानंतर बसमध्ये असलेल्या युवकाने बसच्या वाहक सुवर्णा सोनवणे यांना बेल मारा व बस थांबवा मला खाली उतरायचे आहे, असे सांगितले. यावेळी बसवाहक सुवर्णा सोनवणे यांनी तू बसमध्ये का चढला असा प्रश्‍न करून बस थांबविली. बस थांबताच तो युवक खाली उतरला. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन जणांनी वाहक सुवर्णा सोनवणे यांच्याशी वाद घालून अपशब्द वापरून शिवीगाळ केली. त्याचवेळी बसमध्ये चढलेल्या परेश लक्ष्मण चौधरी या प्रवाशाने शिवीगाळ करणाऱ्या दोन्ही वयस्कर व्यक्‍तींना काका तुम्ही वयस्कर आहात आणि महिला वाहकास शिवीगाळ करीत आहात हे योग्य नाही असे बोलल्याने दोन्ही व्यक्‍तींनी परेश चौधरी यास बसच्या खाली ओढून त्यास मारहाण करू लागले.

श्रीमती सोनवणे, परेश चौधरी व मनीषा चौधरी यांनी आवरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बसचालक शेख यांनी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला असता एका संशयिताने चालकाच्या बाजूने बसमध्ये प्रवेश केला तर उर्वरित दोघांनी वाहकाच्या बाजूने प्रवेश केला. बसमधील प्रवाशांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला असता एका संशयिताने मनीषा चौधरी यांच्या पोटावर लाथ मारली, तर दोघांनी महिला वाहकास शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत महिला वाहकाच्या हातातील तिकीट मशीन खाली पडून त्याचे नुकसान झाले. मारहाण झाल्यानंतर बस कासोदा पोलिस ठाण्यात नेण्यात आली. याबाबत वाहक सुवर्णा सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रवींद्र नामदेव पवार, भूषण रवींद्र पवार, निखिल शंकर साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला वाहकास मारहाण झाल्याची घटना एरंडोल आगारातील कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी निषेध करून संशयितांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com