निसर्गरम्य देवदरीची किमयाच भारी! 

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

येवला तालुक्‍याचा पूर्व भाग चौफेर जंगल, खळाळणारे पाणी अन्‌ डोंगरदऱ्यांनी नटला आहे. नजरेत भरणारे, बागडणारे हरणांचे कळप. पावसाळ्यात फुलणारा डोंगर पठार भुरळ घालतो. हिरवळीने नटलेल्या मनमोहक दृश्‍यामुळे हा परिसर खुलला आहे. छोटासा धबधबा व खोल दरीत असलेल्या सिद्धेश्‍वर मंदिरामुळे देवदरी येथील देवस्थान पर्यटकांना आकर्षित करीत आहे. 

येवला : तालुक्‍याचा पूर्व भाग चौफेर जंगल, खळाळणारे पाणी अन्‌ डोंगरदऱ्यांनी नटला आहे. नजरेत भरणारे, बागडणारे हरणांचे कळप. पावसाळ्यात फुलणारा डोंगर पठार भुरळ घालतो. हिरवळीने नटलेल्या मनमोहक दृश्‍यामुळे हा परिसर खुलला आहे. छोटासा धबधबा व खोल दरीत असलेल्या सिद्धेश्‍वर मंदिरामुळे देवदरी येथील देवस्थान पर्यटकांना आकर्षित करीत आहे. 

अनेक कुटुंबे घेतात पर्यटनाचा आनंद

राजापूर-ममदापूर म्हणजे वनहद्दीचा जंगलमय भाग. यंदा अधिक पावसाने परिसर हिरवळीने नटल्याने शहरासह ग्रामीण भागाचे अनकाईप्रमाणे लाडके धार्मिक व पर्यटनस्थळ बनले आहे. येवल्यापासून २८ किलोमीटर, तर येवला-नांदगाव महामार्गावरील राजापूरपासून अवघ्या आठ किलोमीटरवर देवदरी गाव आहे. गावापासून जवळच असलेल्या खोल दरीत सिद्धेश्‍वर व विघ्नेश्‍वर मंदिर असून, शेजारीच दरी व त्यात पाणी कोसळणारे दृश्‍य धबधब्याचा आनंद देते. दरीतच दोन्ही मंदिरे, तर दरीच्या वर महंत श्री विश्‍वेश्‍वर रामंदागिरी महाराज छोट्याशा कुटीत राहतात. 

महाशिवरात्रीला गावात होतात विविध धार्मिक कार्यक्रम

आजूबाजूने चौफेर जंगल, मध्येच बागडणारी हरणे, तर खोल दरीत पडणारे पाणी, तेथील मंदिरे अशा मनमोहक वातावरणामुळे आजूबाजूच्याच नव्हे, तर तालुक्‍यातील नागरिकांच्या पसंतीस हे स्थळ उतरले आहे. येवल्यातूनही अनेक कुटुंबे सुटीच्या दिवशी देवदरीला येऊन पर्यटनाचा आनंद लुटतात. पाण्यासोबत खेळताना डबा पार्टी येथे रंगते. विशेषतः सुटीच्या दिवशी गर्दी ठरलेली असते. महाशिवरात्रीलाही येथे तीन दिवस विविध कार्यक्रम होतात. दरीत उतरण्यासाठी भव्य पायऱ्या, सुंदर मंदिरे विकसित केली आहेत. यामुळे पर्यटकांची संख्या वाढत असून, शाळा, कॉलेजसाठी हे ठिकाण सहलीचे उत्तम स्थळ बनले आहे. 

वडपाटी देखणे स्थळ 
राजापूरच्या गावालगत जंगलात वडपाटी पाझर तलाव असून, दुरुस्तीमुळे यंदा तो तुडुंब भरला आहे. येथे महादेव मंदिर असून, गोदावरीच्या पाण्याचा मंदिराखालून उगम आहे. 12 महिने येथे पाणी सुरू असते. अनेक भाविकांचे स्थळ श्रद्धेचे ठिकाण बनत असून, आजूबाजूचा परिसर मोहक असल्याने आता पर्यटकांना भुरळ पडू लागली आहे. 

प्रतिक्रिया 
देवदरी व वडपाटी ही पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्गरम्य स्थळे आहेत. अनेक पर्यटकप्रेमी येथे येऊन निसर्गाचा आनंद लुटतात. पर्यटन विभागाने अजून कामे करून विकसित केल्यास चार तालुक्‍यांचे हे आकर्षणाचे ठिकाणे बनतील.- बाळासाहेब दाणे, माजी सरपंच, देवदरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beautiful nature at devdari in yeola