रेल्वेतील गुन्हेगारी बनली बोगस तृतीय पंथीयांची "भाग्यरेषा'

रेल्वेतील गुन्हेगारी बनली बोगस तृतीय पंथीयांची "भाग्यरेषा'

जळगाव - अकोला ते नवापूर, अकोला ते कल्याण हे दोन्ही रेल्वेमार्ग हजारोंचा पोशिंदा म्हणून खानदेशात ओळखले जातात. सरकारच्या खजिन्यात पैसा ओतणाऱ्या याच रेल्वेरूळांवर अनेक तृतीय पंथी गेल्या तीस वर्षांपासून पोसले जात होते. मात्र, टाळी वाजवून "दुवा‘ देणाऱ्या या तृतीय पंथीयांना न जाणे कुणाची नजर लागली अन्‌ गुन्हेगारी वृत्तीचा शिरकाव त्यांच्या नशिबात झाला. बिन मेहनतीचा अमाप पैसा, ऐश, मौज-मस्तीत आयुष्य जगणाऱ्या तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले. परिणामी धावत्या रेल्वेतील गुन्हेगारी वाढत जाऊन त्यातून जमिनीवर गॅंगवार घडल्याचीही उदाहरणे आहेत. 


तृतीय पंथी, किन्नर हा मुळातच समाजातील उपेक्षित घटक आहे. निसर्गाने अन्याय केला म्हणून मानवरूपी शरीराला समाजाने उपेक्षेचा धनी केले आहे. गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून तृतीय पंथी धावत्या रेल्वेत खुशाली मागून जीवन जगत आहेत. अकोला-नवापूर, अकोला-कल्याण हे दोन्ही रेल्वेमार्ग खानदेशातील तृतीय पंथी समुदायाची हद्द समजली जाते. पूर्वी दोन्ही मार्गांवर दहा ते पंधरा अशा समूहाने तृतीय पंथी खुशाली गोळा करीत. एक- दोन लांबपल्ल्याच्या गाड्या केल्या, की त्यांचे बऱ्यापैकी भागत होते. मात्र काळ बदलला, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या तशी तृतीय पंथीयांची संख्या वाढली. परिणामी नैसर्गिक व बनावट तृतीय पंथी असा संघर्ष पेटला आहे. बिन मेहनतीचा अमाप पैसा येत येत असल्याने टाळी वाजवून खुशाली मागणाऱ्यांमध्ये आता बनावट तृतीय पंथीयांच्या टोळ्यांचा शिरकाव वाढला.

सांसारिक तरुण झाले तृतीय पंथी
ज्यांचे लग्न होऊन दोन-तीन अपत्ये त्यांनी जन्माला घातले आहेत, अशा तरुणांना रेल्वेतील कमाईने आपल्याकडे आकर्षित केले आहे. दिवसा सांसारिक आयुष्य जगायचे आणि मध्यरात्रीनंतर साड्या घालून लाली, पावडर लावत रेल्वेगाड्यांतून वसुली करायची. एका गाडीत दोन ते पाच हजारांपर्यंतच उत्पन्न हे तरुण काढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुसावळ विभागात रेल्वेत खुशाली गोळा करणाऱ्या एकूण तृतीय पंथीयांपैकी एक चतुर्थांश म्हणजे सातशेपैकी पावणेदोनशे तरुण बोगस तृतीय पंथी आहेत. जे प्रवाशांना मारझोड, शिवीगाळ करूनच पैसे उकळतात.

तृतीय पंथी पोसणाऱ्या टोळ्या
गुन्हेगारीचे माहेरघर असलेल्या भुसावळ शहरात रेल्वेतील गुन्हेगारी टोळ्या चालविणाऱ्या गुंडांनी बनावट तृतीय पंथीयांना आणल्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वीच उघडकीस आला होता. त्यातून होणाऱ्या हाणामाऱ्या, चाकूहल्ले नवीन नाहीत. मागे या प्रकरणातून खूनही केले गेले. भुसावळ विभागात एका महिलेसह दोन-तीन नामचीन गुंडांनी प्रत्येकी आठ ते दहा-पंधरा बनावट तृतीय पंथीयांच्या टोळ्या रेल्वेत पैसा उकळण्यासाठी आणल्या आहेत. एक तृतीय पंथी टोळीच्या म्होरक्‍याला महिन्याला ठराविक रक्कमही पुरवतो.

शस्त्रक्रिया करून बनले तृतीय पंथी
काही बेरोजगार तरुणांना रेल्वेतील खुशालीने असे खुणावले, की त्यांनी चक्क पुरुषार्थालाच नाकारून शस्त्रक्रिया करवून घेत तृतीय पंथीयांचा धर्म स्वीकारला आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे दोन्ही शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी तब्बल दीड ते अडीच लाखांपर्यंतचा खर्च येतो. नाशिक, सुरत आणि मध्य प्रदेशात अशा शस्त्रक्रिया करून काही तरुणांनी गुरू केले आहेत.
 

गेली तीस वर्षे रेल्वेत, रहिवासी वस्त्या, व्यापाऱ्यांकडून खुशाली घेतोय. कधी कुणावर हात उगारल्याची वेळ आली नाही. गेली दोन वर्षे आजारी असून शिष्यवर्गच सर्व खर्च करतोय. रेल्वेतील वाढती गुन्हेगारी, बनावट तृतीय पंथीयांचा उपद्रव आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांना यंत्रणाच जबाबदार आहे. रेल्वे विभागाला, पोलिसांना आजवर आम्ही मदतच करीत आलो. पुढेही करू. मात्र, बोगस लोकांचा त्यांनी बंदोबस्त करावा.
- जगन मामा (गुरू) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com