दुष्काळी स्थितीत चारा-पाणी टंचाईचा दुसरा झटका दुग्धव्यवसायाला

yeola
yeola

येवला - पावसाळ्यातच दुष्काळ आपली अवकात दाखवू लागला असून याचा सर्वाधिक फटका येवल्याच्या पूर्व भागाला बसत आहे. चारा-पाणी टंचाईच्या पहिल्या झटक्यात पिके तर मातीत गेली पण आता दुग्ध व्यवसायाचा कणा दुष्काळीस्थितीने मोडू लागला असून एकट्या पूर्व भागातच सुमारे १२ ते १५ हजार लिटर दूध संकलनात घट झाली आहे. विकत चारा अन गाईंना टंकरने पाणी पुरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यातील शेती पूर्णतः पावसावर अवलंबून असल्याने आवर्षणप्रवण पूर्व भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गाईंचे संगोपनकरून शेतीला जोडधंदा दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. तालुक्यात सुमारे १२५ दुध शीतकरण व संकलन केंद्रातून दिवसाला ९५ हजार ते १ लाख लिटर दूध संकलन होते. जनावरांसाठी शेतकरी शेतात हिरवा चाराही घेतात सोबतच मका, सोयाबीन, बाजरीची पिके घेऊन चाऱ्याचीही निकड भागवतात. मात्र यंदा पिके शेतातच करपल्याने आताच चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विहिरी, बंधारे कोरडेठाक असल्याने जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊन हिरवा चारा तर मिळेनासा झाला आहे.काहींकडे थोडेफार पाणी आहे पण ते जनावरांच्या पिण्यासाठीच पुरतेय. उंदिरवाडी येथील गणेश क्षीरसागर यांच्याकडे दहा गायी असून त्यांच्यासाठी पाणीच नसल्याने क्षीरसागर यांनी टँकरने पाणी आणून गायींची तहान भागविणे चालवले आहे. अशी अवस्था अनेक शेतकऱ्यांची झाल्याने येणाऱ्या १० महिन्यांचा प्रश्न आताच सतावत आहे. दोन एकरात दरवर्षी चार ते पाच ट्रॉली चारा निघायचा तेथेच या वर्षी एक ट्रॉली निघणेही दुरापास्त झाले आहे या सर्वांचा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून उंदीरवाडी येथील एकट्या जनार्दन शितकेंद्रात जूनमध्ये २० हजार लिटर दूध संकलित व्हायचे तेथेच आज नऊ ते अकरा हजारांच्या दरम्यान दूध संकलित होत आहे.या भागात इतर ठिकाणीही अशीच गंभीर स्थिती असल्याने परतीचा पाऊस न आल्यास येणारे दिवस बिकट असतील हे आजच दिसते.

“शेतात हिरवा चारा नाहीच पण वाळलेला चाराही किती दिवस पुरणार हा प्रश्न आहे.चारा व पाण्याअभावी आताच जनावरे विक्री करावी की काय असा प्रश्न पडतोय.अनेक जण तर गायींना टँकरने पाणी आणत आहे.माझ्याच केंद्रावर सात ते आठ हजार लिटर दूध संकलन घटले आहे,यामुळे पुढील दिवस कसे जाणार ही चिंता आहे.”
-सचिन कळमकर,संचालक,जनार्धन शीतकरण केंद्र

*येवल्यातील शीतकरण प्रकल्प - ४०
*दुध संकलन केंद्र - ४५
*रोज होणारे दुध संकलन - ९५ हजार ते १ लाख
*संकलित दुधाचा पतंजली, एस.आर.थोरात, गोदावरी, प्रभात, अमूल-आनंद, पंचमल आदि डेअरीना पुरवठा होतो.
*येवल्यातील दुध गुजराथ-सुरत, संगमनेर, श्रीरामपूर, सिन्नर, राहाता, कोपरगाव आदि भागात पोहोचते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com